नागपूर: आगामी काळात वेगळ्या विदर्भाची चळवळ पुन्हा जोर धरण्याची शक्यता आहे. कारण, राष्ट्रीय पातळीवर नावाजलेले निवडणूक रणनीती तज्ज्ञ प्रशांत किशोर यांच्याकडून आता वेगळ्या विदर्भासाठीच्या (Seprate Vidharbha) मोहीमेची आखणी केली जाणार आहे. यासाठी प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी मंगळवारी नागपूरमध्ये विदर्भवादी नेत्यांची भेट घेतली. येथील परिसरात ‘मिशन ३०’ चे बॅनर्स लावण्यात आले होते. भारतात सध्या एकूण २९ राज्य आहेत. आता विदर्भ हे ३० वे राज्य करणारच, असा मजकूर या बॅनर्सवर झळकत होता. त्यामुळे येणाऱ्या काळात वेगळ्या विदर्भाचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे.
मुंबईलाही वेगळं राज्य करा; सदावर्तेंच्या खळबळजनक मागणीने राजकारण तापणार
या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांनी मंगळवारी बैठकीपूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, वेगळ्या विदर्भाकडे केवळ छोट्या राज्यांच्या दृष्टीकोनातून पाहिले जाऊ नये. तर हा मुद्दा येथील सामाजिक आणि भौगोलिक परिस्थितीशी निगडीत आहे. केवळ लहान राज्यापुरता स्वतंत्र विदर्भाची संकल्पना मर्यादित नाही. विदर्भ स्वतंत्र झाला तरी ते काही लहान राज्य नसेल. विदर्भात १० लोकसभा मतदारसंघ येतात. एवढे मतदारसंघ असलेल्या राज्याला लहान म्हणता येणार नाही. भारतात १० लोकसभा मतदारसंघापेक्षा कमी मतदारसंघ असलेली राज्येही आहेत. याशिवाय, विदर्भाला स्वत:चा एक असा वारसा आहे, स्वत:चे अर्थकारण आणि समाजकारण आहे. वेगळा विदर्भाचा झाल्यास त्याबाबतच्या फायद्यातोट्याचा विचार झाला पाहिजे. पण यासंदर्भातील अंतिम निर्णय हा विदर्भवादी नेतेच घेतील, असे प्रशांत किशोर यांनी सांगितले.

काश्मीर, लडाख झाले, वेगळा विदर्भ केव्हा?
वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर राज ठाकरे काय म्हणाले?

राज ठाकरे हे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांना वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर बोलत करण्याचा प्रयत्न प्रसारमाध्यमांनी केला. विदर्भ हा महाराष्ट्रपासून वेगळा करावा किंवा करु नये, याबाबतचा निर्णय घेण्यासाठी जनमताचा कौल घेण्यात यावा, असे महत्त्वपूर्ण वक्तव्य मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केले. ज्याप्रमाणे ब्रिटनमध्ये ब्रेक्झिटसंदर्भात जनमत चाचणी झाली तशीच चाचणी विदर्भात झाली पाहिजे. एवढ्या निवडणुका होतात, मग विदर्भात आणखी एक जनमत चाचणी घ्या. लोकांना विदर्भ वेगळा (Seprate Vidharbha) हवा की नको, यावर मतदान करु द्या. त्या जनमत चाचणीच्या निकालाच्या आधारे विदर्भ वेगळा करायचा की नाही, हे ठरवा, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here