दिवसाला देणार १००० दर्शन पास
कोरोना संसर्गाच्या तब्बल दोन वर्षानंतर यंदा पहिल्यांदाच निर्बंध मुक्त नवरात्र उत्सव साजरी होत आहे. आणि याच पार्श्वभूमीवर श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात साफसफाईचे काम सुरू असून दर्शन आणि सुरक्षा याचेही नियोजन करण्यात येत आहे. यंदा पहिल्यांदाच श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी मोफत दर्शनाबरोबर पेड ईपास दर्शन ही ठेवण्यात आले आहे.
पेड ई-पास दर्शनाला हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध
मात्र या पेड ईपास दर्शनाला हिंदुत्ववादी संघटना कडून विरोध होत आहे. याबाबत बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, पेड इपास व्यवस्थेला जास्त विरोध नसून आम्ही पेड ईपास व्यवस्था ही ऑफलाइन पद्धतीनेच राबविणार आहोत. तर दिवसाला केवळ १००० पेड ईपास देण्यात येणार आहेत. शिवाय हे पास केवळ मंदिरातील कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आले असून यामुळे बाजारीकरण ही होणार नाही. ही सर्व व्यवस्था शासनाचे नियम व न्यायालयाचे आदेश पाळून तयार करण्यात आले आहेत. ही व्यवस्था राज्यातील अन्य मंदिराबद्दल देखील उपलब्ध आहे. या पेड ई पासमुळे कोणत्याही भाविकाला त्रास होणार नसल्याचे ही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी म्हटले आहे.
मूर्ती संवर्धनासाठी मूर्तीची पाहणी
करवीर निवासिनी श्री. अंबाबाई मंदिरातील अंबाबाईची मूर्ती ही अत्यंत जुनी असून त्याची झीज होत आहे. यामुळेच मूर्ती संवर्धनाचे काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. सन २०१५ मध्ये ही आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियामार्फत मूर्तीचे संवर्धन करण्यात आले होते. तसेच दर २ ते ३ वर्षांनी मूर्तीची पाहणी करण्यात येत असते. मात्र कोरोना काळात निर्बंध असल्याने पाहणी करतात आली नव्हती. मात्र नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर ही पाहणी पार पडली असून मूर्तीच्या ज्या काही दुरुस्त्या करणे गरजेचे होते त्या करण्यात आल्या आहेत. पुढे देखील त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे मूर्तीचे संवर्धन करण्यात येईल असेही जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी म्हटले आहे.