rupee co operative bank shut banking service: देशातील आणखी एका को-ऑपरेटिव्ह बँकेला टाळं लागणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (आरबीआय) पुण्यातील रुपी सहकारी बँक बंद करण्याचे आदेश दिले आहेत. २२ सप्टेंबरपासून या बँकेच्या सर्व सेवा बंद होतील. त्यामुळे ग्राहकांनी त्यांचे पैसे बँकेतून काढावेत, अशी सूचना आरबीआयनं केली आहे.

रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेनं आरबीआयच्या नियमांकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे बँकेवर कारवाई करण्यात आली. बँकेकडे पुरेसं आर्थिक पाठबळ नसल्यानं आणि उत्पन्नाची शक्यता नसल्यानं आरबीआयकडून कारवाई करण्यात आली. याची माहिती आरबीआयनं ऑगस्टमध्ये ग्राहकांना दिली. १० ऑगस्टला यासंदर्भात एक प्रेस रिलीज प्रसिद्ध करण्यात आलं. रुपी सहकारी बँकेचा परवाना ६ आठवड्यांनंतर रद्द करण्यात येईल. त्यानंतर बँकेच्या सगळ्या शाखा बंद होतील आणि ग्राहकांना त्यांच्या खात्यातून पैसे काढता येणार नाहीत, असा आदेश आरबीआयनं काढला होता. आरबीआयनं आदेशात नमूद केलेला ६ आठवड्यांचा कालावधी २२ सप्टेंबरला संपत आहे. त्यामुळे २२ सप्टेंबरनंतर बँकेचं कामकाज बंद होईल.
ग्राहकांचे पैसे बुडणार?
रुपी सहकारी बँकेच्या ग्राहकांना पाच लाखांपर्यंतच्या रकमेसाठी विम्याचा लाभ मिळेल. डिपॉझिट अँड क्रेडिट गॅरेंटी कॉर्पोरेशनकडून (डीआयसीजीसी) हा विमा मिळत आहे. डीआयसीजीसी आरबीआयची सब्सिडरी आहे. ग्राहकाची ५ लाखांपर्यंत रक्कम रुपी बँकेत असल्यास त्याला पूर्ण क्लेम मिळेल. मात्र ५ लाखांपेक्षा अधिक रक्कम खात्यात असल्यास ग्राहकाला पूर्ण रक्कम मिळणार नाही. त्याला केवळ ५ लाख इतकीच भरपाई मिळेल.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.