डिजिटल पतपुरवठ्याचे स्वागत असून त्याला रिझर्व्ह बँकेचा कायम पाठिंबा राहील, असे दास म्हणाले. डिजिटल पद्धतीने पतपुरवठा करण्यासाठी एखाद्या कंपनीने सुरुवात केल्यास रिझर्व्ह बँक त्या कंपनीला सर्वतोपरी मदत करेल. डिजिटल पतपुरवठा करताना संबंधित कंपनीने नवकल्पना राबवणे गरजेचे आहे. अशी नवकल्पना राबवताना काही समस्या निर्माण झाल्यास त्याची जबाबदारीही त्या कंपनीने उचलणे आवश्यक आहे, यावरही त्यांनी भर दिला.
नागरिकांना आपल्या क्रेडिट कार्डांचा अधिक प्रभावी वापर करता यावा यासाठी यूपीआय प्रणालीशी शक्तिकांत दास यांच्या हस्ते रुपे क्रेडिट कार्ड संलग्न करण्यात आले. यामुळे क्यूआर कोड तसेच यूपीआय आयडीचा वापर करून रुपे क्रेडिट कार्ड वापरता येणार आहे. याचा लाभ सर्वप्रथम पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक आणि इंडियन बँक यांच्या ग्राहकांना होणार आहे.
कमी रकमेचे व्यवहार करण्यासाठी उपयुक्त ठरणारी यूपीआय साइट ही सेवा दास यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. या सेवाचा वापर करून अगदी २०० रुपयांपेक्षा कमी रकमेचे व्यवहारही जलद करता येणार आहेत. याचा लाभ पहिल्या फेरीत कॅनरा बँक, एचडीएफसी बँक, इंडियन बँक, कोटक महिंद्र बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक, युनियन बँक व उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक या बँकांच्या खातेदारांना होणार आहे.
भारताबाहेर राहणाऱ्या भारतीयांना त्यांच्या भारतातील कुटुंबीयांकडे पैसे पाठवायचे असतील तर त्यासाठीच्या भारत बिलपे क्रॉस बॉर्डर बिल पेमेंट्स या सेवेचा शुभारंभही दास यांच्या हस्ते झाला.