नवी दिल्ली: अदानी समूहाने आपल्या दोन सिमेंट कंपन्यांचे मोठ्या प्रमाणात शेअर्स तारण ठेवले आहेत. अदानी समूहाने ACC आणि अंबुजा सिमेंट्समध्ये १३ अब्ज डॉलर (सुमारे १०.३६ ट्रिलियन रुपये) किमतीचे शेअर्स तारण ठेवले आहे. या दोन्ही देशातील सर्वात मोठ्या सिमेंट कंपन्या आहेत. अदानी समूहाने होल्सिम लिमिटेडकडून संपादन पूर्ण केल्यानंतर काही दिवसांनी समभाग तारण ठेवले.

जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात श्रीमंत व्यक्ती आपला व्यवसाय वाढवण्यासाठी किती भुकेला आहे हे कंपनीने उचललेल्या पावलाने दिसून येते. अदानी समूहाचा व्यवसाय बंदरांपासून वीजपर्यंत विविध क्षेत्रात पसरलेला आहे. अदानी समूहाने शुक्रवारीच स्वित्झर्लंडच्या Holcim Ltd कडून अंबुजा सिमेंट आणि त्याची उपकंपनी एसीसी लिमिटेडचे अधिग्रहण पूर्ण केल्याचे वृत्त होते. अहवालानुसार, हे अधिग्रहण ६.४ अब्ज डॉलरमध्ये केले गेले आहे.

आता सिमेंट क्षेत्रात ‘अदानी पॉवर’, काय आहे क्षेत्रात उतरण्याचे कारण; सांगितले पुढचे टार्गेट
शेअर्स तारण का ठेवले जातात?
प्लेज्ड शेअर्स असे शेअर्स असतात, जे तारण ठेवलेले असतात. कोणताही गुंतवणूकदार किंवा कंपन्यांचे प्रवर्तक स्वतः समभाग गहाण ठेवू शकतात. बँक किंवा इतर वित्तीय संस्थांकडे शेअर्स तारण ठेवून कर्ज घेतले जाऊ शकते. अशा प्रकारे कर्जाची हमी म्हणून जे शेअर्स तारण ठेवले जातात, त्यांना प्लेज शेअर्स म्हणतात. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार अदानी समूहाने एसीसी आणि अंबुजा विकत घेतले असून त्यांचे १३ अब्ज डॉलर्सचे शेअर्स तारण ठेवले आहेत. कंपनीच्या प्रवर्तकांनी शेअर्स तारण ठेवणे योग्य मानले जात नाही. कंपनीसाठी हे नकारात्मक चिन्ह आहे.

अदानी समूहावर किती कर्ज?
अदानी समूहाच्या सात कंपन्या स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध आहेत. यातील सहा कंपन्यांवर २०२१-२२ अखेर २.३ लाख कोटी रुपयांचे कर्ज होते. रोख रक्कम काढल्यानंतर निव्वळ कर्ज १.७३ लाख कोटी रुपये आहे. या कंपन्यांकडे यूएस डॉलर बाँड्सचीही थकबाकी आहे. अशा परिस्थतीत आता एसीसी आणि अंबुजा सिमेंटचे सर्व शेअर्स तारण ठेवून १३ अब्ज डॉलरच्या कर्जाने त्यांच्या कर्जाचं ओझं वाढलं असेल.

टाटाही सांभाळू शकले नाही जी कंपनी आता त्याला अदानींची पुढची पिढी तारणार
किती टक्के हिस्सा तारण ठेवला?

ACC लिमिटेडचा ५७ टक्के आणि अंबुजा सिमेंट लिमिटेडचा ६३ टक्के भागभांडवल काही बँक आणि वित्तीय संस्थांकडे आहे. ही माहिती ड्यूश बँक एजीच्या हाँगकाँग शाखेने भारतीय स्टॉक एक्सचेंजकडे केलेल्या फाइलिंगमधून प्राप्त झाली आहे.

वाढत्या कर्जाने वाढली चिंता
ग्रीन एनर्जी आणि मीडिया यांसारख्या नवीन क्षेत्रांमध्ये अदानी समूह वेगाने विस्तार करत आहे. यामुळे अदानी समूहातील वाढत्या कर्जाबाबतही चिंता निर्माण झाली आहे. दरम्यान आता समूहाने शेअर्स तारण ठेवल्याची बाब समोर आली आहे. पण समूह आपल्या काही सूचीबद्ध कंपन्यांमधील तारण समभागांची संख्या कमी करत आहे. त्याचबरोबर काही कंपन्यांचे कर्जही लक्षणीय वाढले आहे. गेल्या महिन्यात आलेल्या एका अहवालात अदानी ग्रीन हे आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात वाईट डेट-टू-इक्विटी गुणोत्तर असल्याचे दिसून आले होते. या डेटाने गौतम अदानींच्या आक्रमक विस्तार योजनेवर धोक्याची घंटा वाजवली आहे.

कर्जाच्या सापळ्यात अदानी समूह; जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत, पाहा डोक्यावर किती कर्जाचा डोंगर
वर्षाच्या सुरुवातीला सिमेंट क्षेत्रात उतरले
अदानी समूहाने या वर्षाच्या सुरुवातीला होलसिम समूहाकडून सिमेंट कंपन्यांचे अधिग्रहण करून या क्षेत्रात प्रवेश केला होता. २०२७ पर्यंत कंपनीची वार्षिक क्षमता दुप्पट करण्याची गौतम अदानी यांची योजना आहे. या करारामुळे आता अदानी समूह देशातील बांधकाम साहित्याचा दुसरा सर्वात मोठा उत्पादक बनला आहे.

शेअर्स तुफान तेजीत
मंगळवारी एसीसी लिमिटेडचा शेअर बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये ३.१३ टक्क्यांनी किंवा ८२.७० रुपयांनी वाढून २७२५.७० वर बंद झाला. दुसरीकडे अंबुजा सिमेंटचा समभाग १.६२ टक्क्यांनी किंवा ९.१५ रुपयांनी ५७४.१० रुपयांवर बंद झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here