राज ठाकरे गेल्या तीन दिवसांपासून विदर्भ दौऱ्यावर आहेत. ज्या विदर्भात एकेकाळी काँग्रेसचं वजन होतं, तर आता भाजप प्रस्थापित आहे, तिथे जाऊन राज ठाकरे यांनी पक्षाचा परीघ विस्तारण्यासाठी ठोस पावलं उचलण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यात त्यांनी विदर्भातल्या ३ जिल्ह्यांचा दौरा केला. नागपूर, चंद्रपूरनंतर आज ते अमरावतीमध्ये आलेले आहेत. यावेळी पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले.
तडजोडीतून मिळालेली सत्ता क्षणभंगुर असते पण…
राज ठाकरे म्हणाले, “कार्यकर्त्यांनी फक्त सेल्फी काढून फक्त सोशल मीडियावर अपलोड करुन काहीही होणार नाही. त्यासाठी सातत्याने काम करावे लागेल. लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न समजून घ्यावे लागतील आणि ते सोडवावे लागतील. त्यातूनच शाश्वत आणि स्थिर सत्ता मिळवण्यापर्यंतचा प्रवास आपण करू शकतो. तडजोडीतून मिळालेली सत्ता ही क्षणभंगुर असते. त्यामुळे तुम्ही मला साथ द्या. आपण पक्ष उभा करून सर्वसामान्य कार्यकर्त्याला सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी…”
हेडगेवारांचा संघ, कार्यकर्त्यांचं काम आणि पक्षाला मिळालेलं आजचं भरघोस यश
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, “काम-शिस्त-सातत्य यातून सत्ता येते. १९९५ साली डॉक्टर हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. पुढे जनसंघाने निवडणूक लढवण्यास सुरुवात केली. कधी एक, कधी दोन, कधी तीन अशी पडझड सहन करत जनसंघ काम करत राहिला. पुढे त्याचे रूपांतर भारतीय जनता पार्टीमध्ये झाले. कायम विरोधात असलेल्या भारतीय जनता पार्टीने काम करणं सोडलं नाही. तब्बल चार पिढ्यांनंतर त्यांना आज स्पष्ट बहुमत मिळालेले आहे. त्यांनी सातत्याने आंदोलनं केली, खस्ता खाल्ल्या त्यामुळे हे यश त्यांना मिळू शकले. कष्ट उपसल्याशिवाय सत्ता मिळत नाही”
प्रत्येक कार्यकर्त्याला प्रशिक्षण देऊ
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांची वागणूक आणि समाजातील प्रतिमा ही स्वच्छ असायला हवी. याकरिता भविष्यात मास्टर प्लॅन तयार करून प्रत्येक कार्यकर्त्याला प्रशिक्षण देण्याचं नियोजन सुरु आहे, असंही राज ठाकरे यांनी सांगितलं.