Agriculture News : महाराष्ट्रातील जालना (Jalna) इथे मल्टी मोडल लॉजिस्टिक्स पार्क (Multi Modal Logistics Parks) विकसित करण्यात येणार आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग लॉजिस्टिक्स व्यवस्थापन मर्यादित आणि जेएनपीटी (Jawaharlal Nehru Port Trust) यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. यामुळं कृषी उत्पादनांच्या निर्यातीला चालना मिळेल. तसेच  मराठवाडा क्षेत्राचे वाहन केंद्र म्हणून जालन्याची ओळख प्रस्थापित होईल, असे मत केंद्रीय   रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री  नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केलं. मल्टी-मोडल लॉजिस्टिक पार्कमुळे शेतकऱ्यांना तसेच आयात निर्यातीच्या अनुषंगाने व्यापाराला मोठा फायदा होणार असल्याचेही ते म्हणाले. 

कृषी उत्पादनांच्या निर्यातीला चालना मिळणार 

मराठवाडा विभागाच्या विकासासाठी सहाय्य्यकारी ठरणारे जालना येथील मल्टी मोडल लॉजिस्टिक्स  पार्क  (एमएमएलपी )  हे या प्रदेशातील एक कार्यरत ड्राय पोर्ट म्हणून काम करेल. या भागातील भंगारावर निर्भर असलेले पोलाद आणि संबंधित उद्योग, फळे आणि भाजीपाला प्रक्रिया कंपन्या, बियाणे उद्योग आणि कापूस क्षेत्राला या मल्टी मोडल लॉजिस्टिक्स  पार्कचा    मोठा फायदा होईल, असे  गडकरी म्हणाले. हे मल्टी मोडल लॉजिस्टिक्स पार्क, समृद्धी मार्ग आणि दिल्ली-मुंबई औद्योगिक मार्गिकेशी संलग्न असणार आहे. या पायाभूत सुविधांमुळं कृषी उत्पादनांच्या निर्यातीला चालना मिळेल आणि  मराठवाडा क्षेत्राचे  वाहन केंद्र म्हणून  जालन्याची ओळख प्रस्थापित होईल असंही त्यांनी सांगितलं. 

पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मल्टी मोडल लॉजिस्टिक्स पार्क महत्वाचे

बहुविध पायाभूत सुविधांच्या विकासासाठी एक ऐतिहासिक क्षण असल्याचे गडकरी यावेळी म्हणाले. आंतरराष्ट्रीय मानकांच्या बरोबरीनं मालवाहतूक बळकटीकरणाचे केंद्रीकरण आणि आंतरराष्ट्रीय मानकांच्या बरोबरीने लॉजिस्टिक खर्च जीडीपीच्या 14 टक्क्यांवरुन  10 टक्क्यांपेक्षा कमी करण्याच्या उद्देशाने, सरकारने भारतमाला प्रकल्पा अंतर्गत 35 मल्टी मोडल लॉजिस्टिक पार्क्स  (एमएमएलपीज ) विकसित करण्यास मान्यता दिली आहे. हा उपक्रम मल्टी मोडल लॉजिस्टिक पार्क्सच्या माध्यमातून  विना अडथळा माल वाहतुकीसाठी एक व्यासपीठ प्रदान करेल, असेही गडकरी यावेळी म्हणाले. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय रस्ते, रेल्वे, पाणी आणि हवाई कनेक्टिव्हिटी यासह वाहतुकीच्या शाश्वत पद्धती शोधण्याच्या मोहिमेवर निरंतर कार्यरत आहे, असे ते म्हणाले.

शेतकऱ्यांना कमी खर्चात त्यांचा माल जागतिक बाजारपेठेत नेता येईल

महाराष्ट्रातील जालना येथील मल्टी-मोडल लॉजिस्टिक पार्कमुळे शेतकऱ्यांना तसेच आयात निर्यातीच्या अनुषंगाने व्यापाराला खूप फायदा होईल, असे मत जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी व्यक्त केलं.  महत्त्वाकांक्षी पीएम गतिशक्ती आणि राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरण अंतर्गत  लॉजिस्टिक क्षेत्राला चालना मिळून हा प्रकल्प आर्थिक विकासात सहाय्य्यकारी ठरेल. शेतकऱ्यांना त्यांचा माल कमी खर्चात जागतिक बाजारपेठेत नेण्यासाठी याचा मोठा फायदा होईल यामुळे  शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनाची  पूर्तता होईल, असेही सर्बानंद सोनोवाल म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here