‘फडणवीसांवर राजशकट हाकण्याची जबाबदारी, कारण…’
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणपती उत्सवादरम्यान मंडळांना दिलेल्या भेटीवरूनही शिवसेनेनं शेलक्या शब्दांत टीकास्त्र सोडलं आहे. ‘एकनाथ शिंदे हे नामधारी मुख्यमंत्री आहेत व त्यांचे चाळीस आमदारही मुख्यमंत्री म्हणूनच वावरत आहेत. त्या अराजकातून राज्य चालवण्याची जबाबदारी फडणवीस यांच्यावर पडते. मुख्यमंत्री म्हणून शिंद्यांवर शिवसेना फोडण्याची, गणपती दर्शन, उत्सव मंडळे, पूजा, लग्न समारंभांना भेटी देण्याची जबाबदारी आहे. फडणवीसांवर राजशकट हाकण्याची जबाबदारी आहे,’ असं ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे.
दरम्यान, ‘फॉक्सकॉन प्रकरणात फडणवीस काय म्हणतात याकडेच गांभीर्याने पाहिले जाते. फडणवीस यांची भूमिका संयमाची आहे, पण महाराष्ट्राची स्पर्धा गुजरातशी नाही. महाराष्ट्राचे गुजरातशी भांडण असण्याचे कारण नाही. तुम्ही गुजरातला लहान भाऊ मानता. शिवसेनेने गुजरातला नेहमीच जुळय़ा भावाचा मान दिला. मुंबई हे जेव्हा द्विभाषिक राज्य होते तेव्हा गुजरात व महाराष्ट्र एकच होता. आपापल्या भाषिक राज्यांसाठी मराठी माणसांबरोबरच गुजराती बांधवांनाही मोरारजी देसाईंच्या अतिरेकी गोळीबारात हौतात्म्य पत्करावे लागले. महाराष्ट्र व गुजरातचा जन्म एकाच गर्भातून झाला. दोन्ही राज्ये व बांधव नेहमीच गुण्यागोविंदाने नांदले. त्यामुळे महाराष्ट्र आणि गुजरातचे नातेसंबंध काय ते फडणवीस यांनी सांगण्याची गरज नाही,’ असा टोलाही शिवसेनेनं लगावला आहे.