कीर्तीकुमार कोठारी हे रत्नागिरी येथील सोन्याच्या व्यापाऱ्यांच्या ऑर्डर घेण्यासाठी नेहमी ठाणे येथून येत होते. १८ सप्टेंबर रोजी रात्री ठाणे येथून रत्नागिरीत आले असता १९ सप्टेंबर रोजी सकाळी ९.१० वाजता ते शहरातील आठवडा बाजार येथील श्रद्धा लॉज या त्यांच्या नेहमीच्याच लॉजवर उतरले होते. काही वेळाने ते सोने व्यापाऱ्यांना भेटण्यासाठी शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या रामआळीत गेले. दिवसभर त्यांच्या सोने व्यापाऱ्यांशी गाठीभेटी सुरू होत्या. मात्र ते पुन्हा लॉजवरच न परतल्याने खळबळ उडाली होती.
कोठारी यांच्या मोबाईलवर केलेला फोनही ते उचलत नव्हते. या प्रकरणानंतर त्यांच्या मुलाला शंका आल्याने ते रत्नागिरीत आले व वडील बेपत्ता झल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. कीर्तिकुमार यांच्याकडे लाखो रुपयांचे सोने होते. ठाणे येथील प्रख्यात सोने व्यापारी असलेले कोठारी हे गेले अनेक वर्ष व्यवसायानिमित्त रत्नागिरीत येत असत.
कीर्तीकुमार कोठारी हे सोमवारी शहरातील रामआळी परिसरात फिरत असताना अनेक दुकानांच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहेत. मात्र रात्री गोखले नाक्यापर्यंत गेल्यानंतर ते गायब झाले. पोलिसांनी त्यांच्या मोबाईल लोकेशन तपासले असता ते जिल्ह्याबाहेर असल्याचं आढळून आलं. या सगळ्या संशयास्पद प्रकारानंतर पोलिसांनी वेगवेगळ्या बाजूने तपासाला सुरुवात केली.
दरम्यान, आता कीर्तीकुमार यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाल्याने रत्नागिरी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.