निवडणुकीत कोणता मुद्दा ठरणार ‘टर्निंग पॉईंट’?
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आधी मराठी आणि नंतर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत शिवसेना ही संघटना जनमाणसात रुजवली. प्रांतिक आणि भाषीय अस्मितेच्या जोरावर शिवसेनेची वाढ झाली. त्यामुळे शिवसेनेशी संबंधित सर्वच प्रतिके या पक्षाच्या समर्थकांसाठी अस्मितेचा विषय ठरली. यामध्ये पक्षाच्या भगव्या झेंड्यापासून पक्षाचं निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाणाचाही समावेश आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शिवसेनेचा मतदार आपला उमेदवार कोण आहे, हे न बघताही केवळ धनुष्यबाण चिन्ह डोळ्यासमोर ठेवून ईव्हीएमचं बटण दाबतो, असं राजकीय निरीक्षक सांगतात. मात्र आगामी निवडणुकीत हे धनुष्यबाण चिन्ह ठाकरेंना मिळणार की शिंदेंना, याबाबतच अनिश्चितता आहे. निवडणूक आयोगाने हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला देण्याचा निर्णय घेतल्यास तो उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का असणार आहे. कारण शिवसेनेच्या मतदारांच्या मनामनात रुजलेलं हे चिन्ह गमावल्यास उद्धव यांनी पुन्हा नव्याने संपूर्ण डोलारा उभा करावा लागणार आहे.
गटप्रमुखांच्या मेळाव्यात नक्की काय म्हणाले उद्धव ठाकरे?
गोरेगाव येथील नेस्को संकुलात शिवसेनेच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपसह शिवसेनेच्या बंडखोरांचा जोरदार समाचार घेतला. ‘शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार’, असे भाषणाच्या सुरुवातीलाच ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. ‘शिवसेनेला बदनाम करण्यासाठी, संपविण्यासाठी सगळे एकत्र येत आहेत. पंतप्रधान, गृहमंत्री, केंद्रीय यंत्रणा आणि सोबत मुन्नाभाईपण आहे. तुम्हाला ठाकरे कुटुंबाला संपवायचे आहे, मग माझ्यासमोर बसलेले सगळे ठाकरे कुटुंबच आहे. या प्रत्येकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत. तुम्ही याच, तुम्हाला अस्मान काय ते दाखवतो’, असे उद्गार उद्धव यांनी यावेळी काढले.
‘शहानितीवर बोलणार’
‘मी दसरा मेळाव्यात शहानितीवर सविस्तर बोलणार आहे. त्यांच्या नितीप्रमाणे मराठी आणि हिंदूंमध्ये फूट पडणार नाही. हिंमत असेल तर येणाऱ्या महिन्याभरात मुंबई महापालिका तसेच विधानसभेची पण निवडणूक घेऊन दाखवा, असे माझे त्यांच्या चेल्याचपाट्यांना आव्हान आहे’, असं ठाकरे यांनी म्हटलं आहे.