Adani meets Uddhav Thackeray | अदानी आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याने वादळ निर्माण झाले होते. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि अदानी यांची बोलणी सुरु असताना आदित्य ठाकरे हे शिवसेना भवनात पत्रकारपरिषद घेत होते. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

 

Gautam Adani Uddhav Thackeray
गौतम अदानी आणि उद्धव ठाकरे

हायलाइट्स:

  • मेळाव्यापूर्वी उद्धव ठाकरे आणि गौतम अदानी यांची भेट
  • वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याने वादळ
मुंबई: जगातील धनाढ्य उद्योगपतींपैकी एक असलेल्या गौतम अदानी यांनी बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. गौतम अदानी हे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले होते. या दोघांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाल्याची माहिती आहे. ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी झाली, याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. मात्र, या भेटीनंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. यानंतर गौतम अदानी भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांचीही भेट घेतली. (Adani meets Uddhav Thackeray in Mumbai)

उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुंबईत शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्याला संबोधित केले. या मेळाव्यापूर्वी उद्धव ठाकरे आणि गौतम अदानी यांची भेट झाली. या भेटीवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीच्या दौऱ्यावर होते. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याने वादळ निर्माण झाले होते. उद्धव ठाकरे आणि अदानी यांची बोलणी सुरु असताना आदित्य ठाकरे हे शिवसेना भवनात पत्रकारपरिषद घेत होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनी वर्सोवा-वांद्रे सी लिंक प्रकल्पाचे काम मिळालेल्या कंपनीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. वर्सोवा-वांद्रे सी लिंकच्या कामासाठी काही पदांची भरती करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी सिव्हील इंजिनिअरिंगची पदवी असणे आवश्यक आहे. मात्र, या पदांसाठीच्या मुलाखती या चेन्नईतील रमाडा प्लाझा हॉटेलमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात एकाही ठिकाणी या पदांसाठी वॉक-इन मुलाखती नाहीत, याकडे आदित्य ठाकरे यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता.
काहीही करुन उद्धव ठाकरेंना संपविण्याचा विडा, त्याला आपल्या मुन्नाभाईची साथ, उद्धव यांचा राज ठाकरेंवर निशाणा
गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय उद्योगविश्वात गौतम अदानी यांचा दबदबा उत्तरोत्तर वाढताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच गौतम अदानी यांनी फ्रान्सचे बर्नार्ड अर्नोल्ट आणि जेफ बेझोस यांना मागे टाकत जगातील दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान संपादन केला होता. अदानींची संपत्ती आता १५५.७ अब्ज डॉलर्स म्हणजे १२.३७ लाख कोटी इतकी झाली आहे. अदानी समूहाचे कर्ज २.२ लाख कोटी रुपयांवरून २.६ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले असतानाच अदानींची संपत्ती एवढी कशी झाली? अदानी यांच्या संपत्तीचं नेमकं रहस्य काय आणि त्यांनी जगातील दुसऱ्या क्रमाकांचा श्रीमंती व्यक्ती होण्याचा मान कसा पटकावला, अशी शंकाही अनेकांकडून उपस्थित केली जात आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here