दौंड : संत तुकाराम महाराज यांची पालखी ज्या मार्गावरून जाते त्या मार्गावरील रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या पालखी महामार्गाच्या कामावेळी दौंड तालुक्यातील रोटी या गावात मोठा गोंधळ उडाला. कारण या रस्ते मार्गासाठी गावातील जमीन अधिग्रहण अद्याप पूर्ण झालेले नसतानाच प्रशासनातील अधिकारी पोलीस बंदोबस्तासह गावातील घरे पाडण्यासाठी दाखल झाले होते. आम्हाला सरकारकडून अद्याप मोबदला मिळालेला नसतानाही आम्ही राहतं घर सोडून जाणार कुठे, असा प्रश्न विचारत गावकऱ्यांनी प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला.

पालखी महामार्गाच्या कामासाठी जमीन अधिग्रहण केलं जात असताना अनेक ठिकाणी नागरिकांकडून तक्रारी केल्या जात आहेत. ‘या महामार्गात आमचे राहते घर जाणार आहे. मात्र महसूल प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने घराचे मूल्यांकन केले होते. आम्ही केलेल्या तक्रारीनंतर प्रशासनाकडून पुनर्मूल्यांकन करण्यात आले. मात्र आम्हाला मोबदला म्हणून किती रक्कम दिली जाणार आहे, याची माहिती अद्याप प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही,’ असं म्हणत रोटी गावातील नागरिकांनी आपल्या तक्रारी मांडल्या आहेत.

शिंदे-फडणवीस सरकारचा ‘तो’ निर्णय अन् अदानी थेट मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय खलबतं?

मूल्यांकनानंतर मोबदला मिळणं तर दूरच मात्र नक्की किती मोबदला दिला जाणार आहे, याची रक्कमही आम्हाला सांगितली गेली नसताना आम्ही राहतं घर सोडून जाणार कुठे? असा सवाल या गावातील नागरिकांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना घेराव घातला. तसंच लोकवस्ती असणाऱ्या ठिकाणी ब्लास्टिंग करून स्फोट घडवले जात आहेत. रस्त्याच्या कामावेळी योग्य काळजी न घेतल्याने गावातील पिण्याच्या पाण्याची बारव जवळ जवळ बंद पडण्याच्या मार्गावर आली आहे, असा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.

दरम्यान, नागरिकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर अखेर प्रशासनाने पाडकाम करणं थांबवून ही कारवाई स्थगित केली आहे. मात्र पालखी महामार्गात जाणाऱ्या आमच्या घर आणि जागेचे योग्य मूल्यांकन झाल्याशिवाय आणि त्याची रक्कम कळाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, अशी भूमिका बाधित गावकऱ्यांनी घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here