Curated by सचिन फुलपगारे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Sep 22, 2022, 4:12 PM

वादग्रस्त संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ आता तपास यंत्रणा एनआयए आणि ईडीच्या निशाण्यावर आहे. तब्बल १३ राज्यांमध्ये PFI च्या शंभरहून अधिक ठिकाणांवर ही छापेमारी करण्यात येत आहे. महाराष्ट्रात मुंबईसह पुणे, मालेगावमध्ये ईडी आणि एएनआयने छापे टाकले आहेत. पीएफआयशी संबंधित गुन्ह्यांत एनआयए, जीएसटी, ईडी आणि महाराष्ट्र एटीएस यांची संयुक्त कारवाई सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणी उच्च अधिकाकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल, केंद्रीय गृह सचिव अजयकुमार भल्ला, एनआयएचे महासंचालक दीनकर गुप्ता, गुप्तचर विभागाचे प्रमुख तपन देका हे उपस्थित होते. देशभरात टाकलेल्या धाडींमध्ये आतापर्यंत पीएफआयच्या १०० हून अधिक नेत्यांना अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, असं एएनआयने म्हटलं आहे.

 

nia raids maharashtra ats has arrested 20 people linked to pfi across the state
NIA, EDची महाराष्ट्रात बेधडक कारवाई, तुमच्या जिल्ह्यात PFIवर कुठे पडले छापे? राज्यात धाडसत्र, वाचा…
एनआयएने महाराष्ट्रासह तेलंगण, केरळ, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’शी संबंधित अनेक ठिकाणांवर छापे टाकले आहेत. आसाममध्येही पोलिसांनी पीएफआयशी संबंधित ९ जणांना ताब्यात घेतलं आहे. तेलंगणध्ये आणि आंध्र प्रदेशात एनआयएने या महिन्याच्या सुरवातीला ४० ठिकाणी छापे टाकले होते. पीएफआय ही संघटना २००६ मध्ये केरळमध्ये स्थापन करण्यात आली होती. ही एक मुस्लिम संघटना आहे. १९९२ मधील बाबरी मशिद ढासाळण्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ही संघटना स्थापन करण्यात आली. बाबरीच्या घटनेनंतर दक्षिण भारतात मुस्लिम कट्टरतावाद्यांनी संघटना एकत्र आल्या होत्या. काही संघटनांनी मिळून पीएफआयही संघटना स्थापन केली.

मुंबई, नवी मुंबई आणि भिवंडीत छापे

‘पीएफआय’च्या कार्यालयांची सध्या ईडी आणि एनआयएकडून झाडाझडती सुरू आहे. नवी मुंबईच्या नेरूळ परिसरात सेक्टर २३ मध्ये असणाऱ्या दारावे गावात पीआयएफच्या कार्यालयावर धाड पडली आहे. गेल्या सहा तासांपासून ईडी आणि एनआयएचे अधिकारी याठिकाणी ठाण मांडून आहेत. त्यामुळे आता या सगळ्या धाडसत्रातून नेमकी काय माहिती पुढे येणार हे पाहावे लागेल. राष्ट्रीय तपास यंत्रणेने पॉप्युलर फ्रंट ऑफिस इंडियाच्या (PFI) देशभरातील मालमत्तांवर छापे टाकले आहेत. यामध्ये उत्तर प्रदेश, केरळ, तेलंगणा आणि तामिळनाडू या राज्यांचा समावेश आहे. देशातील सुरक्षा यंत्रणांकडून गेल्या काही दिवसांपासून टेरर फंडिगप्रकरणाचा तपास केला जात आहे. या धाडसत्रामुळे या सगळ्या तपासाला वेग येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलीस यंत्रणाही सतर्क झाली आहे.

पुण्यासह कोल्हापुरातही एनआयएची छापेमारी, दोघांना अटक

पुण्यातील कोंढवा येथील कौसरबाग येथे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ( पीएफआय) मुख्य कार्यालयावर आज सकाळपासून एनआयएची छापेमारी सुरू आहे. पीएफआय संदर्भात पुण्यात चार ठिकाणी छापेमारी सुरू आहे. पीएफआयचे नेते रझी अहमद खान यांच्या कोंढव्यातील घरावर कारवाई सुरू आहे. कोंढवा येथील कौसरबाग मशिदीजवळील कोंढवा येथील पीएफआयचे राज्य कार्यालय आहे. या कार्यालयावर ही छापेमारी सुरू आहे. तसेच छापा टाकून काही प्रिंटर प्रकारच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. PFI संघटनेच्या पूर्वाश्रमीच्या दोन सदस्यांना अटक केली. कयूम शेख आणि रजी अहमद खान अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. कोल्हापुरात ही छापेमारी सुरू आहे. पहाटेपासून ही छापेमारी सुरू असून या कारवाईबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे. कुठे आणि कोणावर छापेमारी झाली आहे याची माहिती मिळू शकलेली नाही. पण जवाहर नगरमध्ये कारवाई सुरू असल्याचे समजते आहे. राज्यात मुंबई, पुणे, नाशिक ठाणे, नवी मुंबई यासह जिल्ह्यात एटीएसच्या पथकाकडून कारवाई सुरू आहे.

नाशिक जिल्ह्यात मालेगावमध्ये छापेमारी, एकाला अटक

एनआयएच्या टीमनं मालेगावमध्ये कारवाई केली आहे. या छापेमारीत पीएफआय संघटनेचा सदस्य असलेला सैफुरेहमान याला मालेगावच्या हुडको परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. सैफु रेहमान हा पीएफआयचा जिल्हाध्यक्ष असल्याची माहिती समोर येत आहे. संशयित असलेला सैफुरेहमान याला ताब्यात घेतल्यानंतर त्यास तपासणीसाठी नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. तपासणी झाल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन हे पथक रवाना झाले आहे. दरम्यान सैफुरेहमान याच्यावर काही गुन्हे दाखल आहे का? याचाही तपास पोलीस प्रशासनासह एनआयएचे पथक करत आहे. वादग्रस्त असलेल्या ‘पीएफआय’ या संघटनेचे देशभरात तीन लाख फॅमिली अकाऊंट आहेत. या अकाऊंटमध्ये फॅमिली मेंटन्सच्या नावाखाली अनेक कोट्यवधी रुपये जमा झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. दरम्यान, मुस्लिम संघटना असलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेकडून देशभरात धोका असल्याचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

जळगावमधून एटीएसने केली एकाला अटक, संशियत जालन्याचा रहिवासी

अकोल्यातील एटीएसच्या पथकाने जालना येथील अब्दुल हादी रौफ (वय ३२) याला आज जळगावतील मेहरून परिसरातून अटक केली आहे. या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अकोला एटीसने आज सकाळी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून मेहरून परिसर, जळगाव येथून तीन जणांना ताब्यात घेतले होते. चौकशी अंती यापैकी दोन जणांना सोडून देण्यात आले आहे. तर एकाला अटक करण्यात आली असून त्याबाबतची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मुंबई येथे दाखल असलेल्या एका गुन्ह्यात ही अटक केल्याची माहिती जळगाव पोलिसांनी दिली आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या संदर्भात ही कारवाई झाल्याची चर्चा आहे. मात्र पोलिसांनी याला दुजोरा दिलेला नाही. मुंबईच्या एका गुन्ह्यात या संशयीताला अटक करण्यात आल्याची माहिती मात्र पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, जळगावमधून ATS रौफला ताब्यात घेतलं आहे. अब्दुल हादी अब्दुल रौफ हा अनेक वर्षांपासून पीएफआय या संघटनेचं काम करतो. रौफ हा मूळचा जालन्यातील नेर सेवलीतील रहिवासी असून तो संघटनेच्या जालन्यातील सोशल मीडियाचं काम पाहत असल्याची माहिती समोर येत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. जालना येथील अब्दुल हादी अब्दुल रौफ ट्रेझरर जालना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटना तसेच पीएफआय जालनाचे सोशल मीडियाचे सर्व काम अब्दुल हादी पाहतो. सदर व्यक्तीला एटीएसने जळगाव येथून ताब्यात घेतले आहे.

औरंगाबदेत एटीएसचे छापे; चौघाना घेतलं तब्यात

‘पीएफआय’शी संबंधित असलेल्या चार जणांना औरंगाबदेतून एटीएसच्या पथकाने आज पाहटे चार वाजेच्या सुमारास विविध भागातून तब्यात घेतले. त्यातील एकाला १५ दिवसापूर्वी पथकाने तब्यात घेत विचारपूस केली असल्याची माहिती समोर आली आहे. औरंगाबादसह पुणे आणि मुंबईच्या पथकांनी ही संयुक्त कारवाई केल्याचे समोर आले आहे. तब्यात घेतलेल्या

चार जणांपैकी सय्यद फैसल (वय -२८ रा. नॅशनल कॉलोनी, हडको) इम्रान मिल्ली (रा.किराडपुरा) अशी दोघांची नावे असल्याचे सूत्रांनुसार समजते. सय्यद फैसल हा संघटनेचे काम करायचा. मात्र काही दिवसांपासून त्याने हे काम सोडले होते. तो झोमॅटो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. तर मिल्ली हा देखील पीएफआयशी संबंधित आहे. तब्यात घेतलेल्या चार जणांपैकी एकला इतर जिल्ह्यातून तब्यात घेतले असल्याचे कळते. या चौघांची औरंगाबदेत चौकशी सुरू आहे. सूत्रांनुसार चौघांना आज न्यायल्यात हजर करण्यात येण्याची शक्यता आहे.

परभणीमध्ये चौघांना घेतले ताब्यात, नांदेडमधून मुख्य सचिव ताब्यात

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’या संघटनेशी संबंधित असलेल्या चार जणांना परभणीतून एटीएसच्या नांदेड येथील पथकाने आज पाहटे साडेचार वाजेच्या सुमारास विविध भागातून तब्यात घेतले. पोलीस प्रशासनाकडून या कारवाईबाबत मोठी गुप्तता पाळण्यात येत असल्याने संबंधितांची नावे समजू शकलेली नाहीत. तर नांदेड येथील एटीएसच्या पथकाने संबंधितांना ताब्यात घेऊन नांदेड येथे नेले आहे.

परभणीत आपना कॉर्नर भागातील मदिनानगर पाठीजवळ पथकाने छापा टाकून ‘पीएफआय’ संघटनेशी संबंधित असलेल्या तिघांना तब्यात घेतले आहे. यासह परभणी शहरातील दुसऱ्या एका ठिकाणावरून संघटनेशी संबंधित असलेल्या एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. एटीएसच्या पथकाने ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची नावे समजू शकली नाहीत. परभणी शहरातून ताब्यात घेतलेल्या संशयितांना नांदेड येथील न्यायालयामध्ये हाजर केले जाण्याची शक्यता आहे. नांदेडमध्येही ATS पथकाने कारवाई केली आहे. पीएफआयचा मुख्य सचिव मिराज अन्सारीला घेतले ताब्यात. नांदेड शहरातील देगलूर नाका भागातून अन्सारीला अटक करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here