उद्धव ठाकरे यांच्या गोरेगाव येथील सभेची अक्षरशः चिरफाड करण्यासाठी केंद्रीय मंत्री आणि नारायण राणे (Naryan Rane) यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या संपूर्ण पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांचा एकेरीच उल्लेख केला. तर, उद्धव ठाकरे यांनी काल नैराश्यातून भाषण केलं. उद्धव ठाकरे यांचं शिवसेना वाढीसाठी योगदान काय? निष्ठावंतांच्या रक्तावर शिवसेना वाढली. उद्धव ठाकरे केवळ आयत्या बिळावर नागोबा आहेत. उद्धव ठाकरेंनी किती मराठी माणसांना घरं दिली, नोकऱ्या दिल्या? उद्धव ठाकरेंनी जास्त बोलू नये त्यांच तोंड आम्ही बंद करू. संजय राऊत यांच्यासारखे उद्धव ठाकरे देखील जेलमध्ये जातील. आमचा कोथळा काढण्याची भाषा करताय, आमच्याकडे बघितलं तरी आम्ही डोळे काढू, अशी धमकीच नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिली आहे.
नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदेनंतर आता शिवसेना नेत्यांनी नारायण राणे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी तर नारायण राणे यांचे मानसिक संतुलन ढळलं असून त्यांना तात्काळ उपचाराची गरज असल्याचे म्हणत राणेंवर तोफ डागली आहे.
काल मुंबईत झालेला शिवसेनेचा गटप्रमुखांचा मेळावा इतका धडाकेबाज झाला की त्याचा ठसका अगदी दिल्लीपर्यंत पोहोचला. ज्याचा परिणाम दिल्लीहून एका एका वाक्याचे उत्तर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींना इतरांकडून लिहून वाचावे लागले. पण तो ठसका फक्त शिंदेंनाच लागला असं नाही तर तात्काळ तो पालिकेच्या कर्मचाऱ्यांपर्यंत ही पोहोचला आणि दसरा मेळाव्याची परवानगी नाकारली. पण या सगळ्यांमध्ये नारायण राणे बोलले नाही तरच नवल. असा टोला अंधारे यांनी लगावला आहे.
कारण राणेंची अडचण अशी आहे की त्यांचं पुनर्वसन भाजपामध्ये या एकाच अटीवर केलं गेलं आहे. ती म्हणजे बाकी काही काम केलं नाही केलं तरी चालेल, मतदार संघाकडे नाही बघितलं तरी चालेल, पक्ष वाढीसाठी काही नाही केलं तरी चालेल. पण उठताना, बसताना, खाताना, पिताना, झोपताना, लिहिताना, वाचताना प्रत्येक वेळेला उद्धव उद्धवचा जप त्यांनी केला पाहिजे. असा चिमटा सुषमा अंधारे यांनी काढला आहे.
दरम्यान, एकतर बिचाऱ्यांच्या बंगल्याबद्दल कोर्टाचा निर्णय असा आलेला आहे. त्यामुळे आता वाचवेल कोण ? त्यात किरीट सोमय्या हातोडा घेऊन अजून त्यांच्यापर्यंत पोहोचलेले नाहीत. सोमय्यांना कोकणात हातोडक घेऊन जायला वेळ मिळतोय पण मुंबईतल्या मुंबईत हातोडा घेऊन पोहोचले नाहीत. त्यामुळे सोमय्यांचा हातोडा भाजपने अडवून धरावा म्हणून नारायण राणे माध्यमांसमोर गरळ ओकत होते. अशी घणाघाती टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे. तर, नारायण राणे यांचे मानसिक संतुलन ढासाळलं आहे. त्यांना तात्काळ उपचाराची गरज आहे. त्यांच्या दोन्ही मुलांनी बाकी सगळी कामं बाजूला ठेवावी पण आधी वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. अशी खिल्ली सुषमा अंधारे यांनी उडवली आहे.