गजानन काळे यांनी ट्विट करुन यासंदर्भात भाष्य केले आहे. यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख ‘मामू’ असा केला आहे. आदित्य ठाकरेसाठी वरळीत मनसे उमेदवार न देता राजसाहेबांनी मनाचा मोठेपणा दाखवला. २०१२ ला एकनाथ शिंदेनी राजसाहेबांची भेट घेतली असता ठाणे मनपात सेनेच्या महापौरसाठी मनसेच्या ७ नगरसेवकांचा बिनशर्त पाठिंबा दिला. मुन्नाभाईच काळीज कळायला ‘मामू’ला अजून सात जन्म घ्यावे लागतील. गेट वेल सून मामू, असे गजानन काळे आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?
उद्धव ठाकरे यांनी गोरेगावच्या सभेत राज ठाकरेंवर पुन्हा ‘मुन्नाभाई’ म्हणत निशाणा साधला होता. “काहीही करून उद्धव ठाकरेंना संपविण्याचा विडा भाजपाने उचलला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि त्यांचे चेलेचपाटे मुंबई जिंकण्यासाठी काहीच दिवसात मैदानात उतरतील आणि त्याला आपल्या मुन्नाभाईची साथ असेल, पण शिवसेनेच्या नादाला लागाल तर कोथळा काढल्याशिवाय राहणार नाही. शिवसेना म्हणजे रस्त्यावर पडलेली नाही. शिवसेनेच्या वाट्याला यायचा प्रयत्न करु नका. सेना म्हणजे रस्त्यावर पडलेलं झुरळं नाही”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती.
कोणी मैदान देता का मैदान? मनसेची शिवसेनेवर बोचरी टीका
शिवसेनेत अनेक दिवसांपासून रंगलेल्या दसरा मेळाव्याच्या वादावर मुंबई मनपाने मोठा निर्णय जाहीर केला. यंदा मनपाने शिंदे आणि ठाकरे गट या दोघांनाही शिवतीर्थावर दसरा मेळाव्यासाठी परवानगी नाकारली आहे. यावरून, आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाकरे गटाला डिवचलं आहे. कोणी मैदान देता का मैदान? असं म्हणण्याची वेळ आल्याचा टोला प्रवक्ते गजानन काळेंनी ठाकरे गटाला लगावला. शिल्लक सेनेला शिवतीर्थावर टोमणे मेळावा घेण्यासाठी मैदान नाकारलं, असही यावेळी टोला काळेंनी लगावला. शिल्लक सेनाप्रमुखांना फक्त फेसबुकवरच मेळावा घेण्याचा पर्याय उपलब्ध असल्याचंही, गजानान काळे म्हणाले होते.