करोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी जिल्ह्यात ८ जुलैपर्यंत कडक लॉकडाऊनची अमंलबजावणी सुरू झाली आहे. हा लाकडाऊन जनतेच्या हितासाठीच करण्यात येत असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील लॉकडाऊन बाबतचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा आज पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतला. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनजंय चाकुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील उपस्थित होते.
करोनावर मात करण्यासाठी या संसर्गाची साखळी तोडणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचा दर ६७ टक्के असून मृत्यृदर २.२ टक्के आहे. आर.टी.पी.सी.आर लॅबमध्ये रोज सुमारे १०० स्वॅब टेस्टिंग केले जातात. आतापर्यंत जिल्ह्यात २२९ जणांना करोनाची लागण झाली आहे. तर १५४ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. यासर्वांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३९६७ स्वॅब टेस्टिंग करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात सध्या ६९ करोना रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात लॉकडाऊन केल्यामुळे ही संख्या आणखी कमी होवून जिल्हा करोना मुक्त होवू शकेल, असा विश्वास यावेळी सामंत यांनी व्यक्त केला.
नजीकच्या काळामध्ये गणपती उत्सव असून जिल्ह्यात मोठ्या संख्येने चाकरमानी गणपतीसाठी येणार आहेत. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने येणाऱ्या गणेशोत्सवाचे योग्य नियोजन करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठित करावी. त्यासंदर्भातील नियोजनाचा आराखडा तयार करावा. सदरचा आराखडा शासनास सादर करून मंजुरी घेण्यासाठी राज्यस्तरावर प्रयत्न केले जातील. जिल्हास्तरीय समिती गठित करताना जिल्ह्यातील गणेशोत्सव मडळांच्या पदाधिकारी व घरगुती गणपतींच्या प्रतिनिधींचा समावेश करावा, अशा सूचना देवून पालकमंत्री उदय सामंत यांनी केल्या. लालबागचा राजा गणपती मंडळाने जो उपक्रम यावर्षी हाती घेतला आहे. त्याधर्तीवर जिल्ह्यातील गणेश मंडळांनी आरोग्य उपक्रम हाती घ्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी यावेळी जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन सुरू केल्यापासूनच्या कार्यवाहीची माहिती दिली. तसेच जिल्ह्यामध्ये वैद्यकीय सेवांवर कोणतेही निर्बंध घातलेले नसून जिल्ह्यामध्ये औषधांची दुकाने (मेडीकल) पूर्ण वेळ सुरु ठेवण्यास परवानगी दिली असल्याचे सांगितले. तर जिल्ह्यामध्ये पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे. तसेच रात्रीची गस्तही वाढविण्यात आली आहे. जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या सर्व प्रवेशांच्या ठिकाणी नाकाबंदी करून येणाऱ्यांची पूर्ण चौकशी करूनच त्यांना जिल्ह्यात प्रवेश दिला जात असल्याचे यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी सांगितले.
Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines