मिरज तालुक्यातल्या बुधगाव येथे काही दिवसांपूर्वी हनुमान मंदिरामध्ये चोरी झाल्याचा प्रकार घडला होता. दानपेटी फोडून चोरट्याने मुद्देमाल लंपास केला होता. याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील झाला होता. तर हा चोरटा मंदिरातून चोरी केल्यानंतर मशिदीमध्ये चोरी करण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. हा चोर शिराळा तालुक्यातल्या आरळा येथील राहणारा आहे.
संशयित आसिफ याने बुधगाव येथील हनुमान मंदिरात काही दिवसांपूर्वी चोरी केली होती. या घटनेनंतर सांगली शहरातल्या स्टेशन चौक येथील मदिना मशीद येथे आला होता. पण यावेळी मशिदीमध्ये मोबाईल चोरीच्या प्रयत्नामध्ये संशयितरित्या फिरत असल्याचं तेथील काही जणांना आढळून आले त्यानंतर मशिदीतल्या लोकांनी सांगली शहर पोलिसांना याची माहिती दिली. शहर पोलिसांनी मशिदीमध्ये धाव घेत संशयित असिफ याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने बुधगाव मधल्या हनुमान मंदिरातल्या चोरीची कबुली दिली आहे.
त्याचबरोबर असिफ हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याने यापूर्वी रत्नागिरी येथे देखील एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. शहर पोलिसांनी आसिफ याच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली असून त्याच्याकडून चोरी केलेले तीन मोबाईल असा ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलीस निरीक्षक अभिजीत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली असून अधिक तपास झाकीर काझी करत आहेत.