मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या खुर्चीत बसून त्यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) कारभार करतात, असा फोटो ट्वीट करत राष्ट्रवादीने आरोप केले होते. त्यानंतर भाजप नेते आणि कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी पाठराखण केली आहे. त्यात आक्षेपार्ह काहीच नाही, असंही मुनगंटीवार म्हणाले.

सुधीर मुनगंटीवार नेमकं काय म्हणाले?

गेल्या अडीच वर्षात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना जनहितेचे काय निर्णय केले, हे सांगण्यासारखं राहिलेलं नाही. शिवसेनेचा एक नेता कशा प्रकारे राष्ट्रवादीच्या नेत्यासाठी खुर्ची घेऊन धावत गेला, हेही महाराष्ट्राने पाहिलंय. शिवसेनेचे प्रमुख आणि त्यांचे सुपुत्र सोनियाजींच्या समोर किती वाकून अभिवादन करत होते, हेही महाराष्ट्राने पाहिलंय, एखाद्या बैठकीत कोणी असं खुर्चीवर बसलं, तर त्यात आक्षेपार्ह काहीच नाही, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

परवा स्टेट वाईल्ड लाईफ बोर्डाची बैठक होती, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आता ही बैठक तुम्ही वाईस प्रेसिडेंट म्हणून चालवायची आहे. मी त्या खुर्चीवर बसलो, याचा अर्थ राज्याचा प्रगतीला बाधा येते असं ट्विट करणं, अडीच वर्ष खरा मुख्यमंत्री कोण हे समजू शकलं नाही त्यांनी ट्वीट करणं हे आश्चर्यजनक आहे, ये पब्लिक है सब जानती है, शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीला ग्रामपंचायत निवडणुकीत झटका लागला, २०२४ च्या निवडणुकीत जबरदस्त करंट लागेल, असंही मुनगंटीवार म्हणाले.

हेही वाचा : मागच्या बोर्डची कल्पना नव्हती, मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीतून कारभाराचा आरोप, श्रीकांत शिंदेंची सारवासारव

श्रीकांत शिंदे यांची सारवासारव

संबंधित फोटो हा मंत्रालय किंवा वर्षा बंगल्यावरील नाही, तर आमच्या घरातील आहे. ती माझी खुर्ची आहे, मात्र माझ्या मागे ठेवलेल्या बोर्डविषयी मला कल्पना नव्हती, असा दावा श्रीकांत शिंदेंनी केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सक्षम आहेत, ते १८-२० तास काम करत असतात. त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीत कोणालाही कारभार सांभाळायची गरज नाही. जो फोटो व्हायरल झाला आहे, त्यात घरचं ऑफिस आहे. ठाण्याच्या लुईसवाडीतील खासगी निवासस्थानातील हे कार्यालय आहे. मंत्रालय किंवा वर्षा या शासकीय निवासस्थान नाही, असं स्पष्टीकरण श्रीकांत शिंदे यांनी दिलं.

आम्ही दोघंही इथल्या ऑफिसचा वापर करतो. साहेब मुख्यमंत्री होण्याच्या आधीपासूनच वर्षानुवर्ष इथे हजारो जण येतात, त्यांच्या समस्या मांडतात. मी वर्षा किंवा मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलो नाही. माझ्या मागे दिसणारा बोर्ड टेम्पररी होता, तो एका जागेवरुन दुसरीकडे नेता येतो. एकनाथ शिंदे साहेबांची व्हीसी असल्यामुळे त्याचं नियोजन करण्यात आलं होतं. फोटोत चुकीचा अँगल घेऊन कुणाला तरी मुद्दाम खोडसाळपणा करायचा होता आणि हा मुद्दा गाजवायचा होता, असा आरोप श्रीकांत शिंदे यांनी केला.

हेही वाचा : VIDEO | सुळेंना टफ फाईट देणाऱ्या भाजप उमेदवाराला आमदार नवऱ्याने उचललं, सीतारमणही हरखल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here