कल्याण : बंडखोर आमदार हे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो का वापरत आहेत, असा सवाल करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटावर निशाणा साधला होता. उद्धव यांच्या या टीकेला शिंदे गटातील नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे. ‘आम्ही बाळासाहेबांचा फोटो वापरू नये, असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं असेल तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो काढून निवडणूक लढवून दाखवावी,’ असं आव्हानच मंत्री दादा भुसे यांनी दिलं आहे.

शिंदे गटाच्या वतीने शुक्रवारी डोंबिवलीत हिंदूगर्वगर्जना नावाने संपर्क यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, डॉ. बालाजी किणीकर, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, शहर प्रमुख राजेश मोरे, माजी नगरसेवक रमेश म्हात्रे, दिपेश म्हात्रे आदींसह मोठ्या संख्येने शिवसैनिक या मेळाव्याला उपस्थित होते.

शिवसेनेन ‘मैदान’ मारले पण दसरा मेळाव्याच्या वादात मुंबई पालिका तोंडघशी; जाणून घ्या हे ठोस मुद्दे

यावेळी दादा भुसे यांनी आपल्या भाषणात उपस्थितांची गर्दी पाहून हा मेळावा दसरा मेळाव्याचा ट्रेलर असून दसरा मेळाव्याला कोणतं मोठं मैदान शोधावं हा प्रश्न पडला असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांचा मुलगा मुख्यमंत्री झाल्याने शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी केलं. एनडीआरएफच्या निकषाने शेतकऱ्यांना दुप्पट मदत केली जाणार आहे, असं भुसे यांनी म्हटलं आहे.

राणीबागेत खर्चाचा डोंगर; पेंग्विन देखभालीवर १९ कोटी ११ लाख रुपये खर्च

‘उद्धव ठाकरे हे वारंवार सांगत असतात की बाळासाहेबांचा फोटो काढून टाका. मात्र बाळासाहेब हे एका कुटुंबाचे बाप नव्हते तर संपूर्ण महाराष्ट्राचे बाप होते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने पक्ष चालवणाऱ्यांनी शिवाजी महाराजांचा फोटो काढून निवडणूक लढवावी. निवडणुकीसाठी शिवाजी महाराजांना आठवायचं आणि नंतर विसरून जायचं, हे काम सुरू आहे,’ अशी टीका यावेळी दादा भुसे यांनी केली.

कोर्टाच्या निर्णयाबाबत काय म्हणाले दादा भुसे?

शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा घेण्यास उद्धव ठाकरे यांना कोर्टाने परवानगी दिली आहे. याबाबत भुसे यांनी म्हटलं की, आम्ही लोकशाही मानणारे शिवसैनिक आहोत. झालं ते चांगलं आहे. शिवाजी पार्कची क्षमता कमी असल्याने तिथे एवढे शिवसैनिक बसणार नाहीत. त्यामुळे मोठ्या मैदानात आमचा दसरा मेळावा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here