विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीची आढाव बैठक संपन्न झाली. या बैठकीत आपल्या भाषणात अजित पवार यांनी मनातील इच्छा कार्यकर्त्यांसमोर बोलून दाखवली. “जेव्हा जेव्हा मी उपमुख्यमंत्री झालो तेव्हा तेव्हा मी वरिष्ठांकडे गृहमंत्रिपद मागितलं. पण मला दिलं नाही. एकदा अनिल देशमुखांना दिलं आणि त्यांचं मंत्रिपद गेल्यानंतर वळसे पाटलांना दिलं. दोन्ही वेळी मी गृहमंत्रिपद मागितलं पण वरिष्ठांनी मला काही गृहमंत्रिपद दिलं नाही”, अशी उघड नाराजी अजित पवारांनी बोलून दाखवली.
वळसे पाटील म्हणतात….
अजितदादांच्या नाराजीवर नागपूरचे प्रभारी म्हणून नागपूर दौऱ्यावर आलेल्या दिलीप वळसे पाटील यांना विचारलं असता त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. ‘त्यावेळी वरिष्ठांनी तो निर्णय कोणत्या परिस्थितीत घेतला, हे मला सांगता येणार नाही आणि त्यावर मी काही बोलू इच्छित नाही’, असे सांगत त्यांनी अजितदादांच्या नाराजीवर बोलण्याचे टाळले. त्यांची सावध प्रतिक्रिया पाहता त्यांनी ‘वरिष्ठ’ आणि अजितदादांचेही मन राखल्याची नागपूरमध्ये चर्चा होती.
आगामी नागपूर महानगरपालिका डोळ्यासमोर ठेऊन राष्ट्रवादीची तयारी सुरु आहे. याचनिमित्ताने वळसे पाटील नागपूर दौऱ्यावर आले होते. महापालिका निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर बोलताना वळसे पाटील म्हणाले, “निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी आमची सुरु आहे. महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढविण्याचा आमचा प्रयत्न आहे. जर आघाडी झाली नाही तर एकट्याच्या बळावर आम्ही ही निवडणूक लढू कारण पुढे आम्हाला विधानसभा निवडणूक लढायची आहे. पुढील काळात राष्ट्रवादी कॉंग्रेसला विदर्भात चांगले यश मिळेल. कारण राष्ट्रवादीने विदर्भातून ११ आमदार निवडून दिले होते. आता पुन्हा एकदा आम्ही नव्याने तयारी करतो आहे”
अजित पवार काय म्हणाले?
“अजित पवार यांचं पुण्यात कार्यकारिणी मेळाव्यात भाषण सुरु असताना मंचावरील एका पदाधिकाऱ्याने दादांकडे कुठलीशी मागणी केली. त्यावर अजित पवार म्हणाले, माझ्या ओठात एक आणि पोटात एक असं नसतं, हे सगळ्यांना माहिती आहे. आपण सत्तेत असताना मला गृहमंत्रिपद द्या, असं वरिष्ठांना मी सतत म्हटलं. पण मला काही गृहमंत्रिपद दिलं नाही… जेव्हा जेव्हा उपमुख्यमंत्री झालो तेव्हाच गृहमंत्री करा म्हटलं, पण वरिष्ठांनी तसा निर्णय काही घेतला नाही”.
“मागे अनिल देशमुख यांच्यावेळीच मी गृहमंत्रिपदाची मागणी केली पण त्यावेळीही मला दिलं नाही. त्यांचं गेल्यावरही मागितलं तर त्यावेळी दिलीप वळसे पाटलांकडे गृहमंत्रालयाची धुरा दिली गेली. माझ्याकडे गृहमंत्रालयाचा कार्यभार दिल्यानंतर मी त्यांचंही ऐकणार नाही, असं वरिष्ठांना वाटतं”, असं अजित पवार म्हणताच सभागृहात खसखस पिकली.
कार्यकर्ता कुणाचाही असो- नियम म्हणजे नियम- अजितदादांचा खाक्या!
“आमदार चेतन तुपे आणि सुनील टिंगरे यांना विचारा, मी मागेपण बैठका घ्यायचो. त्यात सांगायचो, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता जरी चुकला, तरी नियम एके नियम, त्यातून सूट नाही. दादा पोटात घ्या-पोटात घ्या, असलं चालणार नाही. दादाच्या ओठात आणि पोटात एकच असतं, हे तुम्हाला माहितीये. कार्यकर्ता चुकत नसेल तर त्याच्या पाठीमागे मी खंबीरपणे उभा राहतो ना… पण कार्यकर्ताच चुकतोय म्हटल्यावर किती पांघरुण टाकायचं… पांघरुण कमी पडायचं ना….” अशी फटकेबाजी अजित पवार यांनी केली.