pune crime news, पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा: आंदोलनातील VIDEO व्हायरल; मात्र पोलिसांचा वेगळाच दावा – pakistan zindabad slogans by some youths during protest in support of popular front of india video viral
पुणे : पुण्यासह राज्यभरात ‘एनआयए’ने छापेमारी करत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) अनेक कार्यकर्त्यांची धरपकड केली आहे. महाराष्ट्रातही पुणे, नवी मुंबई, सांगली, कोल्हापूर, नाशिक आदी शहरांमध्ये छापेमारी करत अनेकांना अटक करण्यात आली आहे. पीएफआयवर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ शुक्रवारी पुण्यातील मुस्लीम समाजातील काही तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. पुण्यातील या मोर्चावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मात्र पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आंदोलकांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशा घोषणा दिल्याचाही व्हिडिओ समोर आला आहे.
‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणांमुळे हा मोर्चा आता वादामध्ये सापडलेला असल्याचं पहायला मिळत आहे. मात्र या संदर्भात माहिती घेण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि पोलीस उपायुक्त सागर पाटील यांच्याशी माध्यमांनी संपर्क साधला असता त्यांनी अशा प्रकारच्या कोणत्याही घोषणा देण्यात आल्या नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच अशा प्रकारची अफवा देखील कोणीही पसरवू नये, असं आवाहन देखील पोलीस आयुक्तांकडून करण्यात आलं आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही व्हिडिओंमध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा ऐकू येत आहेत. त्यामुळे खरोखरीच या घोषणा देण्यात आल्या की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. पुणे पोलिसांकडून या संदर्भात पुढील तपास सुरू करण्यात आला असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता बाळगावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, आंदोलन करणाऱ्या ६० ते ७० जणांवर पुणे पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. बंडगार्डन पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिजाज जैनुद्दीन सय्यद (वय २६, शिवनेरी नगर कोंढवा खुर्द) याच्यासह इतर जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. भादंवी १४१, १४३, १४५, १४७ यासह मपोका ३७/१/३ सह १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार नवनाथ डांगे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.