हा विजय मिळवताच भारतीय कर्णधार रोहित शर्माने दिनेश कार्तिकला मिठी मारत विजयाचा जल्लोष केला. रोहित-दिनेश कार्तिकच्या याच सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मुंबई इंडियन्सनेही आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर याबाबतचे फोटो भन्नाट कॅप्शनसह शेअर केले आहेत. ‘मित्र हवा तर असा…गरज लागली की बांबू देतो आणि संधी मिळेल तेव्हा मिठी पण मारतो,’ अशा कॅप्शनने मुंबई इंडियन्सने केलेल्या ट्वीटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.
दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ८ षटकांत ५ बाद ९० धावा केल्या. अक्षर पटेलने दोन विकेट घेत रोहित शर्माचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय योग्य ठरवला होता; पण मॅथ्यू वेडने २० चेंडूंत ४३ धावांचा तडाखा दिला. हर्षल पटेलच्या अखेरच्या षटकात तीन षटकार मारलेल्या वेडने चार चौकारांचाही तडाखा दिला. खराब मैदानामुळे खेळ लांबल्यावर शांत राहिलेल्या प्रेक्षकांना ऑस्ट्रेलियाने अवघ्या ८ षटकात १० चौकार आणि ४ षटकारांची आतषबाजीची भेट दिली.
अक्षर पटेलने दोन षटकांत दोन विकेट घेत ऑस्ट्रेलियाची अवस्था ३ बाद ३१ अशी केली होती, पण वेडने स्टीव्ह स्मिथसह १८ चेंडूंत ४४ धावांची भागीदारी करीत ऑस्ट्रेलियाच्या धावगतीस वेग दिला. हर्षल पटेलच्या दोन षटकांत ३२ धावा ऑस्ट्रेलियाने वसूल केल्या. त्यातही शेवटच्या षटकांत तीन षटकारांसह १९ धावा वसूल करण्यात आल्या होत्या. कमी षटकांचा सामना असल्यामुळे खास टी-२० शैलीतील फटके बघायला मिळणार होते. फिंचने पहिल्याच षटकात हार्दिक पंड्याच्या चेंडूवर यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चौकार मारला. त्यातच अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर कॅमेरून ग्रीनचा झेल सीमारेषेवर टीपण्यास विराट कोहली अपयशी ठरला. मात्र पुढच्याच चेंडूवर कोहलीने याची भरपाई केली. अक्षरने त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलला भोपळा फोडू दिला नाही. त्यानंतर वेडने सूत्रे हाती घेतली, त्यामुळे भारताचा अव्वल गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या दोन षटकांत २३ धावा वसूल झाल्या. वेडने अखेरच्या षटकात त्यावर कळस केला.