नंबर प्लेट तयार करणाऱ्यानं चूक झाली आणि ती आपल्या लक्षात आली नाही, असं स्पष्टीकरण सईद यांनी दिलं. या प्रकरणी कुलाबा वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक हिंदुराव चौधरी यांनी २२ सप्टेंबरला तक्रार दाखल केली. कुलाब्यातील मेरीवेदर रोडवरील पदपथावर चौधरींना जॅग्वार उभी असलेली दिसली. त्यानंतर त्यांनी या प्रकरणी तक्रार नोंदवली.
चौधरींनी ई-चलानच्या मशीनमध्ये कारचा रजिस्ट्रेशन नंबर टाकला. तो नंबर सिस्टिमनं डुप्लिकेट दाखवला. हा नंबर भाईंदर पूर्वेतील राय यांच्या दुचाकीचा असल्याची माहिती त्यांना सिस्टिमवर दिसली. त्यानंतर पोलिसांनी कार मालकाचा तपास सुरू केला. कार मालक मरिन लाईन्सचा असल्याचं पोलिसांना समजलं. सईद कारजवळ आल्यावर पोलिसांनी त्यांच्याकडे कारची कागदपत्रं मागितली. त्या कागदपत्रांवर MH 04 HF 7017 असा क्रमांक होता. मात्र सईद यांच्या कारच्या नंबर प्लेटवर MH 04 HE 7017 असा क्रमांक होता.
सईद वापरत असलेली नंबर प्लेट एका दुचाकीची असल्याची माहिती त्यांना देण्यात आली. या नंबरवर गेल्या ५ वर्षांत वाहतूक नियम मोडल्याप्रकरणी ११ चलान पाठवण्यात आल्याचंही त्यांना सांगण्यात आलं. दुसरीकडे कोणताही नियम मोडत नसताना राय यांना ई-चलान जात होती. त्यामुळे त्यांनी विविध वाहतूक विभागांमध्ये तक्रारी नोंदवल्या होत्या. यामध्ये आपली काहीच चूक नसल्याचा दावा सईद यांनी केल्याचं कुलाबा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय धोन्नार यांनी सांगितलं. नंबर प्लेट तयार करणाऱ्याच्या चुकीमुळे हा प्रकार घडल्याची माहिती सईद यांनी पोलिसांना दिली.