सिंधुदुर्गः जिल्ह्यात कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. याचदरम्यान मोठा गैरव्यवहार होत असल्याचं समोर आलं आहे. कुडाळच्या प्रांताधिकारी वंदना खिरमाळे यांना जिल्हाधिकारी के मंजू लक्ष्मी यांनी कथित गैरव्यवहार प्रकरणी सक्तीच्या रजेवर पाठवल्यामुळे खळबळ उडाली आहे. महामार्ग प्रकल्पग्रस्तांच्या मोबदल्याचे वितरण महसूल खात्याकडून मार्फत होते सध्या हे काम अंतिम टप्प्यात आले असून कुडाळ प्रांतांच्या कक्षेतील एका प्रकरणात हा प्रकार घडला आहे.

मुंबई-गोवा महामार्गासाठी ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली आहे. त्या भूमिपुत्रांच्या जमिनीचा मोबदला देण्यासाठी एका बँकेच्या कर्मचाऱ्या मार्फत लाखो रुपये प्रांताधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्याकडून मागितले जात असल्याचा धक्कादायक प्रकार एका प्रकल्पग्रस्त जमीनदाराने आमदार यांच्या निदर्शनास सोमवारी आणून दिला. त्यानंतर आमदार नाईक यांनी बँक व प्रांताधिकारी कार्यालयात जाऊन जाब विचारला. गेले अनेक दिवस कुडाळ प्रांत अधिकाऱ्यांच्या जनतेतून तक्रारी येत होत्या. आता हे प्रकार उघडकीस येत आहेत. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत, माझ्या मतदारसंघात भ्रष्टाचाराचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, लोकांना त्रास झालेला खपवून घेणार नाही. कुडाळ मालवणसह जिल्ह्यात भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना थारा देणार नाही. असे आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ प्रांतधिकारी सौ वंदना खरमाळे यांना सुनावले. प्रांताधिकारी म्हणून तुम्ही चौकशी करा तुमच्या कार्यालयाचे नाव सांगत एका अधिकाऱ्याने पैसे घ्यायला सांगितले असे उघडकीस आले आहे. नसेल तर त्याच्या विरोधात पोलीस तक्रार द्या असंही आमदार वैभव नाईक यांनी सांगितलं.

दरम्यान प्रांताधिकारी कार्यालयात लोकांकडून कामासाठी पैसे घेतले जातात असा थेट आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. हायवे प्रकरणी जमीन मालकांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळले जात आहेत या प्रकरणी चौकशी व्हावी अशी मागणी आम्ही पालकमंत्री जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई-गोवा महामार्गासाठी जमीन गेलेल्या उर्वरित जमीन मालकांची मोबदल्याची रक्कम प्रांताधिकारी कार्यालयात आली आहे. ती वितरित करण्यात येत आहे. मात्र याबाबत त्रुटी काढून प्रांत कार्यालयातील अधिकारी पैसे उकळतात असा आरोप गेल्या काही दिवसांपासून होत आहे.

पिंगुळी येथील मांगीलाल परमार या जमीन मालकाच्या जमिनीचा मोबदला कुडाळ येथील इंडस बँकेच्या शाखेत जमा झाला होता. याबाबत ९ जूनला नोटीस काढण्यात आली होती. रक्कम अदा करणाऱ्या बँक कर्मचार्‍यांशी त्यांनी संपर्क केला असता तुमच्या प्रकरणात त्रुटी आहेत. त्यामुळे पाच लाख रुपये द्या मग त्या तात्काळ दूर करून पैसे देण्यात येतील असे सांगितले. यापुढे परमार यांनी प्रांत कार्यालयाशी संपर्क साधला असता हरकतींवर सुनावणीसाठी तारीख लावण्यात आली.

अडीच लाखाला करण्यात येत होते समेट

हायवेच्या जमिनीचा मोबदला देण्यासाठी लाखो रुपये मागितले जात असल्याचा प्रकार शिवसेना पदाधिकारी अतुल बंगे व कार्यकर्त्यांनी आमदार नाईक यांच्या कानावर घातला. जमीनदार यांचे ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकवले ते ऐकवले असता आमदार नाईक संतप्त झाले. प्रांताधिकारी कार्यालयाकडून लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतल्याचे आरोप होतात, आता तर पुरावा हाती आला आहे. योग्य वेळी हा प्रकार थांबविला पाहिजे असे सांगत आमदार नाईक व सहकाऱ्यांनी इंडस बँक गाठली.

प्रांत कार्यालयातील अधिकाऱ्याचे घेतले नाव

आपण स्वतः पैसे घेत नव्हतो तर प्रांताधिकारी कार्यालयातून आपणास पेमेंट करण्यापूर्वी काही रक्कम सेल्फ चेक स्वरूपात घेण्यास सांगितल्याचे स्पष्ट केले. सुरुवातीपासून नाव सांगण्यास तयार होईना कॅमेरा बंद करा मला त्रास होणार नाही याची तुम्ही जबाबदारी घेता काय असे विचारले, जबाबदारी घेतो असे सांगितल्यावर प्रांताधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याचे त्याने आपल्या शाखा व्यवस्थापकाचा समोरच नाव सांगितले.

आमदारांनी गाठले थेट प्रांत कार्यालय

त्यानंतर आमदार वैभव नाईक व सहकाऱ्यांनी थेट प्रांताधिकारी कार्यालय गाठले. आर्थिक व्यवहार व शासकीय कार्यालय असल्याने नाईक यांनी पोलिसांना पाचारण केले. पोलीस आल्यानंतर प्रांताधिकारी यांना निरोप देण्यात आला. तर वंदना खरमाळे स्वतः बाहेर आल्या. नाईक यांनी हा प्रकार सांगितला. याबाबत आपण आत बसून चर्चा करुया असे प्रांताधिकार्‍यांनी सांगितले.

प्रांताधिकारी यांना ऐकविल्या ऑडिओ क्लिप

आमदार नाईक यांनी बँकेच्या कर्मचाऱ्याने प्रांताधिकारी कार्यालयाचे नाव सांगून एका प्रकल्पग्रस्ताकडून लाखो रुपयांची मागणी केली असे सांगत हा कर्मचारीच समोर उभा केला. त्या कर्मचार्‍याने बँकेत काय सांगितले हे त्याच्या शाखाधिकारी यांच्या तोंडुनच प्रांताधिकार्‍यांना ऐकवले.

रत्नागिरी बातमी | Ratnagiri News | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here