बुरखा परिधान करून प्रेयसीला भेटण्यासाठी जाणं पडलं महागात
मिळालेल्या माहितीनुसार, वडाळा गावात हा युवक प्रेयसीला भेटण्यासाठी चक्क बुरखा परिधान करून आला होता. त्यामुळे हा व्यक्ती मुलं पळवणारा असल्याचा संशय स्थानिकांना आला आणि फक्त संशयावरूनच नागरिकांनी त्याला चांगलाच चोप दिला आहे. यावेळी स्थानिकांची या ठिकाणी मोठी गर्दी जमली होती. या ठिकाणहून पोलिसांशी गाडी जात होती. त्यामुळे गर्दी पाहताच पोलिसांनी हस्तक्षेप केला. पोलिसांनी जमावाला शांत करून त्या गर्दीतून युवकाला बाहेर काढलं विचारपूस केल्यानंतर पोलिसांना सर्व प्रकार समजला. संशयित प्रेयसीला भेटण्यासाठी आला होता, अशी माहिती समोर आली. मात्र समाज माध्यमावर मुलं चोरणारी टोळी सक्रिय असल्याच्या मेसेजमुळे किती संभ्रम निर्माण होत आहे हे नाशिक मध्ये आजच्या आज घडलेल्या अशा दोन घटनांमुळे दिसून येत आहे.
सकाळची घटना ताजी, तेवढ्यात..
लहान मुलं चोरणारी टोळी समजून नाशिकमध्ये दोघांना मारहाण केल्याची सकाळची घटना ताजी असतानाच पुन्हा एक घटना समोर आली आहे. नाशिकमध्ये मुलं अपहरण करणारी टोळी सक्रिय असल्याच्या अफवा काही दिवसांपासून पसरत आहे. त्यामुळे प्रत्येक अज्ञात व्यक्तीकडे संशयाच्या नजरेने बघितलं जात आहे. एका चारचाकी गाडीतून पैशांची बॅग घेऊन पळण्याच्या तयारीत असणाऱ्या दोघांना मुलं चोर असल्याचे समजून बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेत संशयित जखमी झाले होते.
लहान मुलं पळवणारी टोळी सक्रिय असल्याच्या अफवा ; पालक भयभीत
सध्या नाशिकमध्ये मुलांचे अपहरण करणारी टोळी सक्रिय असलेल्या अफवांचे पीक पसरले आहे. समाज माध्यमांवर तसेच संदेश व्हायरल होत आहे. पोलिसांनी हा संदेश फेक असल्याची माहिती देखील दिली आहे. मात्र नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती अजूनही त्यांच्या मनात घर करून आहे. त्यामुळे नागरिक प्रत्येकाला संशयाच्या नजरेने बघत आहेत.
याआधीही नाशिकमध्ये ब्लॅंकेट विक्रेत्यांना लहान मुलं चोरणारे समजून जबर मारहाण केल्याची एक घटना समोर आली होती. त्यानंतर आता पुन्हा या दोन घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेऊ नका असे आवाहन करण्याची वेळ पोलिसांवर वारंवार येते आहे.