धोनीनं दोन वर्षांपूर्वीदेखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला होता. मात्र तो आयपीएलमध्ये खेळत राहिला. चेन्नई सुपर किंग्जचं नेतृत्त्व त्याच्याकडेच आहे. धोनी आयपीएलमधून निवृत्ती जाहीर करेल, असे तर्कवितर्क लढवले जात आहेत. २०२३ ची आयपीएल स्पर्धा धोनीची शेवटची स्पर्धा असू शकते.
आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांमध्ये चेन्नईचा समावेश होतो. धोनीच्या नेतृत्त्वात संघानं ४ वेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. २०२२ मध्ये चेन्नईला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. स्पर्धेच्या सुरुवातीला धोनीनं कर्णधारपद रविंद्र जाडेजाकडे सोपवलं. मात्र संघाला सातत्यानं पराभव पत्करावे लागल्यानं धोनीनं पुन्हा संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. आपण २०२३ मध्येही चेन्नईसाठी खेळू असं धोनीनं स्पर्धेनंतर सांगितलं होतं.
आयपीएल २०२३ मध्ये पुन्हा होम आणि अवे व्हेन्यूचा नियम लागू होईल. त्यामुळे चेन्नईच्या संघाला होम ग्राऊंडवर खेळण्याची संधी मिळेल. चेन्नईतल्या चिन्नास्वामी स्टेडियमवर धोनी त्याचा अखेरचा आयपीएल सामना खेळू शकतो. या मैदानात धोनी २०१९ मध्ये शेवटचा सामना खेळला. आयपीएल २०२० चा संपूर्ण सीझन यूएईमध्ये खेळवण्यात आला. तर आयपीएल २०२१ चा पहिला टप्पा मुंबई, पुण्यात आणि दुसरा टप्पा यूएईमध्ये खेळवला गेला.