फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याच्या निषेधार्थ वडगाव मावळ येथे शिवसेनेच्या वतीने काढण्यात आलेल्या जनाक्रोश मोर्चात अदित्य ठाकरे बोलत होते. या जनआक्रोश आंदोलनात शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख माजी मंत्री सचिनभाऊ अहिर यांच्या शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, प्रत्येक राज्याला वाटते आपल्या राज्याचा विकास व्हावा. यासाठी विकासाचे मोठमोठे प्रकल्प व उद्योग यावेत, राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगार व नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात. मात्र राज्यात आमच्या व विशेषतः राज्यातील युवकांच्या पाठीत खंजीर खुपसून तयार झालेल्या अवैध गद्दार खोके सरकारच्या डोळ्यासमोर राज्यातील प्रकल्प गुजरातला गेला. असे सांगत “चाळीस आमदारांसोबत मीही राजीनामा देतो , सर्वांनी निवडणुकीला सामोरे जाऊ , असे आवाहनही ठाकरे यांनी विरोधकांना केले, आम्ही, केंद्राला किंवा गुजरातला दोष देत नाही. हा दोष खोके सरकारचा आहे . महाराष्ट्रातल्या राजकीय अस्थिरतेचा फायदा गुजरातने घेत आपल्या राज्यात होऊ घातलेला फॉक्सकॉन प्रकल्प हिरावून घेतला.
खरे मुख्यमंत्री कोण हेच कळत नाही- आदित्य ठाकरे
सध्या राज्याचे खरे मुख्यमंत्री कोण हेच कळत नाही . माझ्या गटात कोण येतंय त्यापेक्षा महाराष्ट्रात रोजगार कोण आणतंय ते पाहा . आमच्यावर चाळीस वार केलेत पण राज्यातल्या जनतेवर वार करू नका. शिंदे सरकार हे सरकार नसून ती एक सर्कस आहे. हे सरकार कधीही कोसळेल याचा नेम नाही. असा टोलाही आदित्य ठाकरेंनी यावेळी बोलताना लगावला.
वेदांता फॉक्सकॉन ही कंपनी मावळ तालुक्यासाठी तसेच पुणे जिल्हा व महाराष्ट्रासाठी मोठा रोजगार देणारा प्रकल्प होता . मात्र महाराष्ट्रावर अन्यात करत ही कंपनी गुजरातला नेण्यात आली आहे. यामुळे महाराष्ट्रातील सुमारे लाखभर युवकांना मिळणारा रोजगार बुडाला आहे . सदरची कंपनी पुन्हा महाराष्ट्रात व पुणे जिल्ह्यातील मावळात यावी, यासाठी व आमचा रोजगार, आमचा हक्क या मागणीसाठी हे जनआक्रोश आंदोलन करण्यात आले असल्याचे सांगितले.