वृत्तसंस्था, देहराडून : उत्तराखंडातील एका रिसॉर्टमध्ये नोकरी करणाऱ्या अंकिता भंडारी या १९ वर्षीय तरुणीची हत्या झाल्याचे उघड झाल्यानंतर शनिवारी येथील राजकीय वातावरण ढवळून निघाले. येथील एका भाजप नेत्याच्या मुलाच्या मालकीचे हे रिसॉर्ट असून या तरुणीच्या हत्येचे कारण धक्कादायक असल्याचेही स्पष्ट झाले आहे. या रिसॉर्टचा मालक पुलकित आर्य, व्यवस्थापक व सहव्यवस्थापक यांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, भाजपने या नेत्याची व त्याच्या दोन्ही मुलांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

रिसॉर्टमध्ये स्वागतिका असणाऱ्या अंकिताने तेथील उतारूंना ‘विशेष सेवा’ देण्यास नकार दिल्याने तिची हत्या करण्यात आली, अशी माहिती पोलिस महासंचालक अशोककुमार यांनी दिली. शनिवारी तिचा मृतदेह एका कालव्यात सापडल्यानंतर स्थानिकांच्या भावनांचा उद्रेक झाला. स्थानिकांनी या रिसॉर्टची तसेच भाजप आमदार रेणू बिश्त यांच्या कारची तोडफोड केली.

दसरा मेळाव्याची धार वाढवण्यासाठी शिंदे गटही कामाला; अतिमहत्त्वाची व्यक्ती येणार?

ही मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या आईवडिलांनी सोमवारी केली होती. या तरुणीचा फेसबुक मित्र असणाऱ्या एका तरुणाने केलेल्या आरोपांनंतर या प्रकरणातील गांभीर्य वाढले. या रिसॉर्टच्या मालकांनी माझ्या मैत्रिणीस तेथील पाहुण्यांना शरीरसुख देण्याची सूचना केली होती. परंतु तिने नकार दिल्याने तिची हत्या करण्यात आली, असा आरोप या तरुणाने केला. ‘तिने मला कॉलही केला होता व मी खूप संकटात सापडल्याचे तिने सांगितले होते. परंतु काही वेळाने रात्री साडेआठनंतर तिचा फोन बंद झाला व अनेक प्रयत्न करूनही आमचा संपर्क होऊ शकला नाही’, असेही तो म्हणाला.

यानंतर या तरुणाने रिसॉर्टचा मालक पुलकित आर्य याच्याशी संपर्क साधला. परंतु ती तिच्या खोलीत झोपायला गेली आहे, असे त्यास पुलकितने सांगितले. या तरुणाने दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा पुलकितला कॉल केला, परंतु तेव्हा त्याचा फोन बंद असल्याचे आढळले. त्यामुळे या तरुणाने या रिसॉर्टचा व्यवस्थापक अंकित याला कॉल केला. त्यावर ती आत्ता जिममध्ये आहे, असे उत्तर त्याला मिळाले. या तरुणाने चिकाटी न सोडता रिसॉर्टच्या शेफला फोन केला. परंतु त्या तरुणीस मी कालपासून पाहिले नाही, असे शेफने त्याला सांगितले.

शिवसेना-भाजपमध्ये राडा सुरू असताना मुंबई काबीज करण्यासाठी ‘आप’चा प्लॅन ठरला

या प्रकरणी पोलिस तपासात चालढकल होत असल्याचे लक्षात आल्यानंतर हा तपास महसूल पोलिसांकडून नेहमीच्या पोलिसांकडे सोपविण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी २४ तासांत या तिघांना अटक केली. या तरुणीच्या शवविच्छेदनाचे काम शनिवारी सुरू होते. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी पोलिस उप महासंचालिका पी. रेणुका देवी यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे. दरम्यान, या रिसॉर्टजवळ असणाऱ्या लोणच्याच्या कारखान्यास शुक्रवारी रात्री आग लागल्याने पुरावे नष्ट करण्यासाठी ही आग लावण्यात आली, असा आरोप स्थानिकांनी केला.

भाजपमधून हकालपट्टी

या प्रकरणाची दखल घेत पक्षनेते विनोद आर्य व त्यांच्या दोन्ही मुलांची भाजपने शनिवारी हकालपट्टी केली. पुलकित आर्य हा या प्रकरणातील आरोपी असून त्याच्यासह त्याचा भाऊ अंकित आर्य याचीही भाजपने गच्छंती केली. विनोद आर्य हे हरिद्वार येथील मोठे नेता आहेत. तर, अंकित हा राज्य ओबीसी आयोगाचा उपाध्यक्ष होता.

काँग्रेस आक्रमक

या घटनेचा निषेध करत प्रदेश काँग्रेसतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. ही तरुणी १८ तारखेपासून बेपत्ता असूनही चार दिवसांनंतर एफआयआर नोंदवण्यात आला. उत्तराखंडात महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष करन माहरा यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here