Reliance Industries chairman | काही दिवसांपूर्वीच देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांमध्येच मुकेश अंबानी हे थेट राज्याचे सत्ताकेंद्र असलेल्या वर्षा बंगल्यावर पोहोचल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. देशातील दोन आघाडीचे उद्योगपती काही दिवसांच्या अंतराने प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांच्या प्रमुखांना का भेटले असावेत, ही शंका उपस्थित झाली आहे.

हायलाइट्स:
- मुकेश अंबानी आणि त्यांचा मुलगा अनंत अंबानी हे दोघे शनिवारी रात्री उशीरा वर्षा बंगल्यावर
- या भेटीबद्दल अत्यंत गुप्तता बाळगण्यात आली होती
काही दिवसांपूर्वीच देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. अदानी आणि उद्धव ठाकरे यांच्यातही दीर्घकाळ चर्चा झाली होती. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांमध्येच मुकेश अंबानी हे थेट राज्याचे सत्ताकेंद्र असलेल्या वर्षा बंगल्यावर पोहोचल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. देशातील दोन आघाडीचे उद्योगपती काही दिवसांच्या अंतराने प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांच्या प्रमुखांना का भेटले असावेत, ही शंका उपस्थित झाली आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी अदानी-अंबानींमध्ये चढाओढ?
राज्यात सत्तापालट झाल्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हातातील सर्व अधिकार गेले आहेत. शिवसेना पक्ष कधी नव्हे इतक्या मोठ्या संकटात सापडला आहे. मग अशा परिस्थितीत गौतम अदानी (Gautam Adani) वाट वाकडी करून उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर का गेले असावेत, असा प्रश्न अनेकांना पडला होता. यामागील संभाव्य कारण धारावी पुनर्विकास प्रकल्प असल्याचे सांगितले जात आहे. गौतम अदानी यांनी उद्धव ठाकरे यांची नुकतीच भेट घेतली होती. यावेळी उभयतांमध्ये साधारण तासभर चर्चा झाली होती. त्यानंतर अदानी आणि ठाकरे यांची ही भेट धारावी पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.
शिंदे-फडणवीस सरकारने अलीकडेच धारावीच्या पुनर्विकासासाठी निवीदा मागवण्याचा निर्णय घेतला होता. ठाकरे सरकारच्या काळात धारावी पुनर्विकासाबाबत तीन बैठका झाल्या होत्या. त्यावेळी या प्रकल्पासाठी अदानी समूहाचे नाव चर्चेत होते. उद्धव ठाकरे यांनी बुधवारी गोरेगावच्या नेस्को मैदानावर झालेल्या शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्यात धारावीच्या पुनर्विकासाचा मुद्दा उपस्थित केला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते की, धारावीला देशातील महत्त्वाचे आर्थिक केंद्र बनवणे हे शिवसेनेचे उद्दिष्ट आहे. हे स्वप्न शिवसेना प्रत्यक्षात उतरवेल, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर अदानी आणि ठाकरे यांची भेट चर्चेचा विषय ठरली होती. अदानी-ठाकरे यांच्या भेटीनंतर मुकेश अंबानी लगेचच एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचले. त्यामुळे मुकेश अंबानी याच विषयासंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटले असावेत का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.