या तरुणाने मित्राची चेष्टामस्करी करण्यासाठी सोशल मीडियावर मुलगी म्हणून त्याच्याशी चॅटिंग सुरू केली. बरेच दिवस हे सुरू राहिल्यावर त्या मित्राला भेटण्याचे ठरले. तेव्हा, त्याला मुलगी वाटावी म्हणून या तरुणाने बुरखा परिधान केल्याचे समजते. चॅटिंग करत हा तरुण पुढे जात असताना नागरिकांना तो अपहरणकर्ता असल्याचा संशय आला. त्यानंतर हा सर्व प्रकार घडला. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात तोंडाला रुमाल बांधलेली एक महिला फिरत होती. त्या महिलेने तोंडाला रुमाल बांधलेला असल्याने नागरिकांनी त्या महिलेवर मुले चोरत असल्याचा संशय आल्याने नागरिकांनी तिला मारहाण केली. कुठलीही खात्री न करता तसेच महिलेस बाजू मांडण्याची संधी न देता या महिलेस चपलांनी मारहाण केली. महिलेला पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर ती बेघर असल्याची माहिती समोर आली आहे.
दुसरीकडे मुंबईप्रमाणेच नागपूर व पुण्यातही मुले चोरणाऱ्या टोळीबाबतची अफवा पसरली आहे. नागपूर शहरातील अनेक व्हॉट्सअॅप ग्रुपवर एक चित्रफित व्हायरल झाली. शनिवारी दिवसभर पोलिसांचे फोन खणखणत होते. एका मुलाचे या टोळीने अपहरण केल्याचीही चर्चा असल्याने काही काळ खळबळ उडाली होती. पोलिसांनी तातडीने पावले उचलत मुलाला शोधले. त्याच्या वडिलाचा दुधाचा व्यवसाय आहे. मुलगा दूध वितरणासाठी गेला. घरी परतताना दुधाच्या कॅनचे झाकण कुठेतरी पडले. वडील रागावतील, या भीतीने मुलगा बेपत्ता झाला होता.
पुण्यातही हीच अफवा पसरली असल्याने पालक घाबरले आहेत. मात्र, अशा प्रकारच्या ध्वनिचित्रफितीवर पालकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले असून, अफवा पसरविणाऱ्यांविरोधात कारवाईचा इशारा दिला आहे. पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये; तसेच अशा प्रकारचे संदेश किंवा ध्वनीचित्रफित प्रसारित करू नये. नागरिकांना काही अनुचित प्रकार आढळून आल्यास त्यांनी तातडीने पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षात संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.