आशिष शेलार यांनी रविवारी यासंदर्भात ट्विट करुन भाष्य केले. पीएफआयचा देशविरोधी कट उघड झाला आहे. त्यानंतर पुण्यात तर पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. इतिहासातील खानांची सदैव “उचकी” लागणारे, भाजपाचा राजकीय कोथळा काढायला निघालेले, संकटे टळून गेल्यावर करुन दाखवलेचे “होर्डिंग” लावणारे, आता कुठे गेले? मर्द असल्याचे वारंवार जाहीर करणाऱ्या…हिंदुत्ववादी असल्याचा कांगावा करणाऱ्या…सतत संघ, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमितभाई शाह यांच्यावर टीका करणारे… उरल्यासुरल्या पक्षाचे प्रमुख कुठे आहेत?, अशी बोचरी टीका आशिष शेलार यांनी केली आहे. त्यामुळे आता शिवसेना या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, हे पाहावे लागेल.
नेमका वाद काय?
पुण्यासह राज्यभरात ‘एनआयए’ने छापेमारी करत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) अनेक कार्यकर्त्यांची धरपकड केली आहे. महाराष्ट्रातही पुणे, नवी मुंबई, सांगली, कोल्हापूर, नाशिक आदी शहरांमध्ये छापेमारी करत अनेकांना अटक करण्यात आली होती. पीएफआयवर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ शुक्रवारी पुण्यातील मुस्लीम समाजातील काही तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. पुण्यातील या मोर्चावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी वादग्रस्त घोषणा दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही व्हिडिओंमध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा ऐकू येत आहेत. त्यामुळे खरोखरीच या घोषणा देण्यात आल्या की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. पुणे पोलिसांकडून या संदर्भात पुढील तपास सुरू करण्यात आला असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता बाळगावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
आंदोलन करणाऱ्या ६० ते ७० जणांवर पुणे पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. बंडगार्डन पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिजाज जैनुद्दीन सय्यद (वय २६, शिवनेरी नगर कोंढवा खुर्द) याच्यासह इतर जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. भादंवी १४१, १४३, १४५, १४७ यासह मपोका ३७/१/३ सह १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार नवनाथ डांगे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.