kolhapur crime news, कोल्हापुरात सराईत गुंड जामिनावर बाहेर आला, मात्र १५ दिवसांतच जीवनाला मुकला – attack on a criminal out on bail from jail in kolhapur
कोल्हापूर : शहरातील यादवनगर येथे रेकॉर्डवरील गुंडाचा अज्ञातांनी दगडांनी ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना काल शनिवारी रात्री उशिरा घडली. चिन्या ऊर्फ संदीप अजित हळदकर (वय २४) असं हत्या करण्यात आलेल्या गुंडाचं नाव आहे. तो १५ दिवसांपूर्वी तुरुंगातून जामिनावर सुटला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, संदीप हळदकर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. १५ दिवसांपूर्वी तो तुरुंगातून जामिनावर सुटला होता. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्याला स्थानबद्ध करण्याची कारवाई सुरू केली होती. दरम्यान शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास चिन्या हळदकर आणि संशयित यांच्यात दौलतनगर परिसरात वादावादी झाली. ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. या वादातून चौघांनी चिन्यावर जीवघेणा हल्ला केला व दगडाने ठेचून खून केला. Gadchiroli news : पार्टीत वाद, मित्रांनीच ३४ वर्षीय तरुणाला संपवलं; पोलिसांनी असा लावला गुन्ह्याचा छडा
दरम्यान खून करून तेथून सर्व संशयित पसार झाले. मात्र घटनेनंतर माहिती मिळताच तात्काळ राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस व अधिकारी श्वान पथकासह तत्काळ दाखल झाले आणि परिसरातून चौकशीला सुरुवात केली. त्यानंतर अज्ञात हल्लेखोरांच्या शोधासाठी विविध पथके ठिकठिकाणी रवाना केली आहेत. चिन्या हळदकरसह त्याच्या भावाने परिसरात मोठी दहशत निर्माण केली होती. विविध गंभीर गुन्ह्यांत चिन्याला यापूर्वी अटक झाली होती. जामिनावर बाहेर येताच त्याने पुन्हा दहशत माजवण्यास सुरुवात केली होती. त्याच्याविरुद्ध मारामारी, खुनी हल्ला, खंडणी वसुलीचे १० ते १२ गुन्हे दाखल आहेत. चिन्या याच्यावर यापूर्वी तडीपारीची देखील कारवाई झाली होती, असं पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, चिन्या हळदकर याच्या हत्येनंतर आज सकाळपासून नातेवाईकांनी राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या बाहेर मोठी गर्दी केली आहे.