भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने परभणीतील स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहनाच्या मुख्य सोहळ्यास राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे हे हजर होते. त्या पाठोपाठ मराठवाडा मुक्तिदिनाच्या अमृत महोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने १७ सप्टेंबर रोजी सावे हेच पुन्हा ध्वजारोहनाच्या कार्यक्रमाकरीता परभणीत दाखल झाले होते. या दोन्ही सोहळ्यातील सावे यांच्या हजेरीने भारतीय जनता पक्षाच्या महानगरासह जिल्ह्यातील कार्यकर्ते कमालीचे सुखावले होते. परभणी जिल्ह्यास यावेळी सावे यांच्या रुपाने भारतीय जनता पक्षाचाच पालकमंत्री लाभेल, असा विश्वास व्यक्त करीत भाजपाचे नेते-कार्यकर्ते पालमंत्री पदाच्या नियुक्त्यांकडे लक्ष ठेवून होते.
शनिवारी सायंकाळी मुख्यमंत्री शिंदे यांनी पालकमंत्री पदाची यादी जाहीर केली. त्यात तानाजी सावंत यांच्याकडे उस्मानाबाद पाठोपाठ परभणीच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात अली आहे आणि सहकारी मंत्री सावे यांना बीड व जालन्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परभणीच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी अशी अचानक तानाजी सावंत यांच्याकडे सोपवल्यामुळे परभणी मध्ये हा भाजपाला धक्का मानला जात आहे.
दुसरीकडे तीस वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या परभणी मध्ये शिंदे गटाला रोवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही खेळी असल्याचे बोलले जात आहे. तानाजी सावंत यांना पालकमंत्री पदाची जबाबदारी दिल्याने शिंदे गटाला परभणीत अच्छे दिन येणार का हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.