बबली (तमन्ना भाटिया) ही हरियाणातल्या एका गावातली सर्वसामान्य मुलगी. तिच्या गावचं वैशिष्ट्य म्हणजे गावातल्या प्रत्येक घरात एक पहेलवान आहे. गावातले बहुतांश तरुण दिल्लीतल्या विविध क्लबमध्ये ‘बाऊन्सर’ची नोकरी करत आहेत. तिच्या गावाला बाऊन्सरचं गाव म्हणूनच ओळखलं जातं. दहावी नापास असणारी, काहीशी खोडकर, बिनधास्त अशी बबलीही एखाद्या पहेलवानापेक्षा कमी नाही. गावातील सिद्धू (साहिल वैद्य) हा बबलीच्या प्रेमात आहे. सिद्धूही पहेलवान असून तो दिल्लीच्या नाइट क्लबमध्ये नोकरी करत आहे. दुसरीकडे बबलीच्या आयुष्यात विराज (अभिषेक सक्सेना) हा सुशिक्षित मुलगा येतो. त्यांच्यात मैत्री होते. विराजला भेटता यावं यासाठी बबली दिल्लीला जायचं ठरवते. त्यासाठी बबली नाइट क्लबमध्ये ‘महिला बाऊन्सर’ची नोकरी मिळवण्यासाठी धडपडते. सुरुवातीला घरातले सदस्य तिच्या या निर्णयाला विरोध करतात; पण ती त्यांना तयार करते. ती दिल्लीला पोहोचते आणि विराजला तिच्या प्रेमाची कबुली देते. पुढं कथानकात नेमकं काय घडतं याची उत्तरं सिनेमात मिळतील..
या कथेच्या निमित्तानं ‘महिला बाऊन्सर’चं भावविश्व सिनेमात दाखवलं आहे. कथानक २०१९ मध्ये घडणारं आहे. सिनेमातील गाणी हे त्याचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. गाण्यांमुळे सिनेमाचं कथानक रेंगाळत नाही. यातले बहुतांश संवाद मूळ हरियाणवी भाषा किंवा त्या लहेजातले असल्यानं वास्तवदर्शी वाटतात. सिनेमा मनोरंजक असला, तरी पटकथेत काहीशी अस्थिरता जाणवते. काही प्रसंग ताणले जातात, तर काही चटकन निघून जतात. परिणामी पूर्वार्धात सिनेमा थोडा डगमगतो; पण उत्तरार्धात ही कसर भरून निघते. तमन्नानं या हरियाणवी बोलत प्रेक्षकांना सुखद धक्का दिला आहे. संवादकौशल्य आणि भूमिकेची देहबोली तिनं अचूक पकडली आहे. तिचा बिनधास्त वावर लक्षात राहतो. सौरभ शुक्ला यांचं कामही उत्तम. सिनेमाची तांत्रिक बाजू रेखीव आहे. भूतकाळात काही धडाकेबाज सिनेमे दिल्यानंतर भांडारकर यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीपेक्षा वेगळं काही द्यायचा प्रयत्न केला आहे आणि मनोरंजक म्हणून तो नक्कीच पाहावा असा आहे.
बबली बाऊन्सर
निर्मिती ः विनीत जैन, अमृता पांड्ये
दिग्दर्शक ः मधुर भांडारकर
लेखन ः अमित जोशी, आराधना देबनाथ, मधुर भांडारकर
कलाकार :ः तमन्ना भाटिया, अभिषेक बजाज, साहिल वैद्य, सौरभ शुक्ला
छायांकन ः हिंमत धामीज
संकलन ः मनीष प्रधान
ओटीटी ः डिज्ने प्लस हॉटस्टार
दर्जा ः साडेतीन स्टार