माधुरी मिसाळ यांच्या जनसंपर्कासाठी असलेल्या मोबाईलवर तसेच त्यांचे दीर माजी नगरसेवक दीपक मिसाळ यांच्या मोबाईलवर मेसेज करुन ५ लाख रुपयांची खंडणी मागण्याचा प्रकार समोर आला असून पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
या प्रकरणी दीपक मिसाळ यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. दीपक मिसाळ यांच्या फिर्यादीनंतर बिबवेवाडी पोलिसांनी इम्रान समीर शेख ( विकासनगर , घोरपडीगाव ) याला अटक केली आहे. यापूर्वी इम्रान शेख याच्यावर चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीपक मिसाळ यांचा मोबाईल तसेच त्यांची भावजय आमदार माधुरी मिसाळ यांचा जनसंपर्कासाठीचा संपर्क क्रमांक याच्यावर आरोपीने मेसेज केले आहे. त्याने कधी २ लाख, कधी ३ लाख, तर कधी ५ लाख रुपयांची खंडणी मागणारे मेसेज केले आहे. सुरुवातीला त्यांनी अशा मेसेजकडे दुर्लक्ष केले होते. त्यानंतर या व्यातिरिक्त आणखी एका मोबाईल क्रमांकावर त्याने पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दीपक मिसाळ यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यानंतर पोलिसांनी भा. द. वि. ३८६ आणि आय टी अॅक्ट कलम ६६ सी नुसार गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत आमदार माधुरी मिसाळ यांनी अधिक माहिती देताना म्हंटल आहे की, माझे दिर दीपक मिसाळ यांना त्यांच्या मोबाईलवर दिवसाला ४० ते ५० धमकीचे मेसेज येत आहेत. पैसे नाही दिले तर बलात्काराची केस दाखल करू असा मेसेज पाठवत आहे. दिवसेंदिवस ते खंडणीची रक्कम वाढवत आहेत. २ दिवसाआधी तक्रार देऊन ही काल रात्री १२ वाजेपर्यंत मेसेज येत होते. आणि शेवटचा मेसेज असा होता की त्यात पैसे नाही दिले, तर मारून टाकू अशी धमकीच देण्यात आली होती.
या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. ज्या ज्या मुलांची यात नावे येत आहेत, त्या मुलाचे अकाऊंट हॅक झाले आहेत. जवळजवळ १५ ते १६ नंबरवरून हे मॅसेज येत आहे, अशी माहिती यावेळी आमदार माधुरी मिसाळ यांनी दिली आहे. हा सगळा प्रकार हा प्रकार १८ ते २३ सप्टेंबर दरम्यान घडला आहे.