ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना भारताला पहिल्याच षटकात धक्का बसला. पहिल्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर लोकेश राहुल बाद झाला आमि भारताला मोठा धक्का बसला. त्यानंतर रोहित शर्माही आज मोठी खेळी साकारू शकला नाही आणि तो १७ धावांवर आऊट झाला. भारताचे दोन विकेट्स पडले असले तरी त्यानंतर सूर्यकुमार यादव मैदानात आला आणि त्याने सामन्याचे चित्रच बदलून टाकले. विराट कोहलीनंतर येऊनही त्याने धडाकेबाज फटकेबाजी करत कोहलीच्या आधीच अर्धशतक झळकावले. सूर्या आता मोठी खेळी साकारेल, असे वाटत होते. पण मोठा फटका मारताना सूर्या बाद झाला. सूर्याने यावेळी ३६ चेंडूंत पाच चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर ६९ धावांची दमदार खेळी साकारली.
सूर्यरकुनार बाद झाला असला तरी कोहली मात्र खेळपट्टीवर उभा होता. सूर्या बाद झाल्यावर कोहलीने यावेळी अर्धशतक झळकावले आणि संघाला विजयाच्या जवळ घेऊन गेला. सूर्या बाद झाल्यावर हार्दिक पंड्या फलंदाजीला आला आणि त्याने कोहलीला चांगली साथ दिली. सूर्या बाद झाल्यावर कोहली अधिक जबाबदारीने खेळला. कोहली यालवेळी संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब कसे होईल, याचा विचार करत होता. त्यामुळे कोहलीने यावेळी आपला अनुभव पणाला लावला. सूर्या बाद झाल्यावर कोहलीने जास्त जोखीम घेतली नाही. पण सेट झाल्यावर मात्र कोहलीच्या बॅटमधून चांगले फटके निघत होते आणि चाहत्यांच्या डोळ्याचे पारणे फिटत होते.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने धडाकेबाज सुरुवात केली असली तरी अक्षर पटेलने यावेळी अचूक आणि भेदक मारा केला. आपल्या फिरकीच्या तालावर त्याने कांगारूंना चांगलेच नाचवले. त्यामुळेच भारताला यावेळी ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येवर खीळ बसवता आली आणि त्यांनी विजयाचा पाया रचल्याचे यावेळी पाहायला मिळाले. भारताला यावेळी विजयासाठी १८७ धावा कराव्या लागणार होत्या.