वाशिम : कारंजा शहरातील झाशीची राणी चौकात एका चहाच्या टपरीवर साधारण ७५ ते ८० वर्षांची एक वृद्ध महिला चहा मागत होती. हडकुळं शरीर, हातात काठी, डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा, अन डोक्यावर गाठोडं. बोली-भाषेवरून आजी जवळपासची वाटत नव्हती. त्यामुळे शिक्षक राजू मते यांनी वृद्धेची विचारपूस केली. आजी रस्ता चुकल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

मते यांनी आजींना नाव, गाव, पत्ता विचारला. आजींच्या डोळ्यात टचकन पाणी तरळलं. ती सांगू लागली मला लेकीच्या घरी जायचंय, ‘मह्या चंदाच्या घरी जायाचं!’ पण ती सांगत असलेलं तिचं गाव विदर्भात जवळपास कुठेच नव्हतं. मते सरांनी रडणाऱ्या आजीला शांत केलं. तिला चहा प्यायला दिला आणि पुन्हा विचारपूस केली तेव्हा तिने सांगितलं तिचं ‘सारवाडी’ नावाचं गाव जालना जिल्ह्यात आहे आणि ती लेकीकडे औरंगाबादला जाण्यासाठी निघाली आहे. पण चुकून ती विदर्भात येऊन पोहोचली.
जमाव सापाला ठेचणार होता, पाप लागेल म्हणत साधूनं वाचवलं; पण एक चूक महागात पडली
राजू मते यांनी ‘एक ऊब जाणिवेची’ या सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते मोहित गावंडे, ‘सास कंट्रोल रूम’चे श्याम सवई यांना आजीची माहिती दिली. त्यांनी जालना जिल्ह्यातील मित्रांना फोन केले. तेव्हा त्यांना पंचायत समिती सदस्य नरवाडे यांचा नंबर मिळाला. मतेंनी त्यांच्याशी संपर्क साधला व त्यांच्या माध्यमातून आजीबाईच्या घरच्यांचा मोबाईल क्रमांक मिळवून त्यांच्याशी बोलणं केलं व ती सुखरूप असल्याचे सांगितले. कारंजातील पत्रकार मंचाचे अध्यक्ष दिलीप रोकडे यांच्या मदतीने आजीबाईला ट्रॅव्हलचे तिकीट काढून जालन्याला नातेवाईकांकडे रवाना केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here