यावेळी तानाजी सावंत यांनी त्यांच्या मराठा आरक्षणासंदर्भातील वक्तव्यावरुन निर्माण झालेल्या वादासंदर्भात स्पष्टीकरण केले. देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षण मिळवून दिले. त्यानंतर एक-दोन बॅचेसमधील मराठा तरुणांना नोकरी आणि शिक्षणात आरक्षणही मिळाले. पण २०२० मध्ये सर्वोच्च न्यायालायने मराठा आरक्षण रद्द केले. आरक्षण रद्द झाल्यानंतर ते आता राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येईपर्यंत एकही मराठा नेता मराठा आरक्षणाबाबत काहीच बोलला नाही. पण जसे नवीन सरकार स्थापन झाले, तसे या विकृती जाग्या झाल्या. मी मराठा समाजाचा आहे, शेतकऱ्याच्या मुलगा आहे. त्यामुळे मी मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या मताचा आहे. मराठा समाजाला ओबीसीतून किंवा अनुसूचित जमातीमधून आरक्षण मिळाले पाहिजे, असे सांगून काहीजण मराठा आणि इतर समाजांमध्ये दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याविषयी मला बोलायचे होते. पण माझे बोलणे अर्धवट दाखवून त्याचा विपर्यास करण्यात आला. माझे म्हणणे इतकेच होते की, नव्या सरकारला आणि मंत्र्यांना कायदेशीर कसोटीवर टिकणारे मराठा आरक्षण मिळवण्यासाठी थोडी फुरसत द्या. त्यासाठी आम्हाला २०२४ पर्यंतची मुदत द्या. तोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन मराठा आंदोलनात सहभागी होईन, असे तानाजी सावंत यांनी सांगितले.
तानाजी सावंत नेमकं काय बोलले?
आता मराठा समाजाकडून आम्हाला ओबीसी किंवा अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातून आरक्षण द्या, अशी मागणी केली जात आहे. या सगळ्यामागचा कर्ता करविता कोण आहे, हे तुम्हा-आम्हाला समजणे गरजेचे आहे. सगळ्यांना याबाबत माहिती आहे, पण कोणी बोलत नाही. दोनवेळा आरक्षण गेल्यानंतर मराठा समाज गप्प राहिला. पण आता राज्यात सत्तांतर होताच तुम्हाला लगेच मराठा आरक्षणाची खाज सुटली, असे वक्तव्य तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी केले आहे.
मराठा क्रांती मोर्चाचा तानाजी सावंतांना निर्वाणीचा इशारा
तानाजी सावंत यांच्या वक्तव्यानंतर मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला होता. त्यांच्याकडून तानाजी सावंत यांना निर्वाणीचा इशारा देण्यात आला होता. तानाजी सावंत यांनी मराठ्यांनी ओबीसी आरक्षण बाबत घेतलेल्या भूमिकेबाबत बोलताना तारतम्य बाळगावे. तुम्ही भाषणात काय बोलत आहात? तुम्हाला काहीतरी भान राहिले आहे का? जर तुम्हाला उघड समाजाच्या भूमिके सोबत येणे शक्य नसेल, तर कमीत कमी विरोध तरी करू नका. तरी आपण जी समाज विरोधी भूमिका घेतली त्याबद्दल समाजाची माफी मागा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक योगेश केदार यांनी केली होती.