मुंबई: ऑस्ट्रेलियाविरुद्धची तीन टी-२० सामन्यांची मालिका टीम इंडियानं २-१ अशी जिंकली. पहिला सामना गमावल्यानं मालिकेत पिछाडीवर पडलेल्या भारतानं उर्वरित २ सामने खिशात घातल मालिका विजयाची नोंद केली. टी-२० विश्वचषक सामन्याआधी मिळालेला हा विजय भारतासाठी महत्त्वाचा आहे. सूर्यकुमार यादव, विराट कोहलींनी अर्धशतकी खेळी साकारत संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं.

भारतीय गोलंदाजीचा आधारस्तंभ असलेल्या जसप्रीत बुमराहची ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी धुलाई केली. बऱ्याच कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या बुमराहनं दुसऱ्या सामन्यात २ षटकांत २३ धावा देऊन एका फलंदाजाला माघारी धाडलं होतं. मात्र काल झालेल्या तिसऱ्या सामन्यात कांगारुंनी बुमराहची यथेच्छ धुलाई केली. भारतानं या सामन्यासह मालिका जिंकली असली तरी बुमराहची गोलंदाजी भारतासाठी चिंतेचा विषय आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराटनं असं काही केलं की कोच राहुल द्रविड मागे पडले; किंग कोहलीचा आणखी विक्रम
पॉवरप्ले असो वा डेथ ओव्हर्स, ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी बुमराहची गोलंदाजी फोडून काढली. त्यामुळे कालच्या सामन्यात बुमराह सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याच्या ४ षटकांमध्ये ५० धावा निघाल्या. या बदल्यात त्याला एकही विकेट घेता आली नाही. बुमराहनं काल १२.५० च्या इकॉनॉमीनं धावा दिल्या. बुमराहनं टी-२० सामन्यात पहिल्यांदाच इतक्या धावा मोजल्या. त्याआधी २०१६ मध्ये बुमराहनं वेस्ट इंडिजविरुद्ध ४७ धावा दिल्या होत्या. त्यावेळी त्यानं २ फलंदाजांना बाद केलं होतं.
विक्रमी मालिका विजय आणि गवसलेला फॉर्म, तरीही रोहित शर्मा खुश नाही, हातात ट्रॉफी आणि म्हणाला
जसप्रीत बुमराह भारतीय गोलंदाजीचा कणा समजला जातो. मात्र सध्या तो फॉर्ममध्ये नाही. बुमराहचे यॉर्कर भल्याभल्या फलंदाजांना अडचणीत आणतात. मोक्याच्या क्षणी विकेट काढण्यात, धावा रोखण्यात बुमराह महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे बुमराहचा हरवलेला फॉर्म भारतासाठी चिंतेचा विषय आहे. बुमराह आतापर्यंत ६० टी-२० सामने खेळला असून त्यात त्यानं ७० फलंदाजांना बाद केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here