मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते आणि राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यावरून सावंत यांच्याविरोधात राज्यभरात टीकेची झोड उठली असून आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही संताप व्यक्त केला आहे. ‘मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी राज्यातील सर्वच पक्ष प्रयत्न करत असताना शिंदे-फडणवीस सरकारमधील आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठ्यांना आरक्षणाची खाज सुटली आहे, असं अत्यंत आक्षेपार्ह व बेजबाबदार विधान केले आहे. तानाजी सावंत यांचे हे विधान मराठा समाजाची बदनामी करणारे व त्यांचा अपमान करणारे असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावंत यांच्या विधानावर खुलासा करावा व बेताल वक्तव्य करणाऱ्या तानाजी सावंत यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी,’ अशी मागणीच नाना पटोले यांनी केली आहे.

नाना पटोले यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत तानाजी सावंत यांचा समाचार घेतला आहे. तसंच शिंदे-भाजप सरकारवरही निशाणा साधला आहे. ‘मराठा आरक्षणाची मागणी मागील अनेक वर्षांपासून होत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यातून विविध संघटना, राजकीय पक्ष यांचे प्रयत्न सुरू आहेत. सरकारी पातळीवर व न्यायालयीन पातळीवरही हा लढा सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले. २०१४ साली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने मराठी समाजाला आरक्षण दिले होते. परंतु त्यानंतर आलेल्या फडणवीस सरकारच्या निष्क्रियतेमुळे मराठा आरक्षण संपुष्टात आले. आजही हा प्रश्न सुटावा व मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असताना राज्यातील एक मंत्री अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करतो हे अत्यंत निषेधार्ह आहे,’ अशा शब्दांत पटोले यांनी आपला रोष व्यक्त केला.

Narayan Rane: नारायण राणेंना सुप्रीम कोर्टाचाही दणका; अधीश बंगल्यातील अनधिकृत बांधकाम पडणारच

‘सत्तेची मस्ती कशी उतरवायची हे जनतेला चांगलेच माहीत आहे’

वादग्रस्त वक्तव्याबाबत टीका करत असताना नाना पटोले यांनी सावंत यांना इशाराही दिला आहे. ‘तानाजी सावंत हे सातत्याने वादग्रस्त विधाने करून वातावरण बिघवण्याचे काम करत असतात. प्रसिद्धी माध्यमांबद्दलही त्यांनी नुकतंच वादग्रस्त विधान केलं होतं. या महोदयांनी याआधी महाराष्ट्राला विकत घेण्याची भाषा केली होती. तानाजी सावंत यांचे विधान सत्तेचा माज दाखवते पण महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे, सत्तेची मस्ती कशी उतरवायची हे त्यांना चांगले माहीत आहे,’ असं पटोले यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here