
जय जिवदानी… विरारच्या जीवदानी मातेचा नवरात्रोत्सव
मंदिराची काय आहे आख्यायिका?
विरार रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला डोंगरावर जीवदानी माता ( Jivdani Mata Mandir Story ) वसली आहे. जीवनदानी मातेचं मंदिर ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत प्राचीन आहे. या मंदिराची निर्मिती पांडवांनी वनवासात असताना केल्याची आख्यायिका सांगितली जाते. येथील एका गुफेत पाच पांडवांनी देवीची स्थापना केली होती. हे स्थान ‘पांडव डोंगरी’ सदृश बनवलं गेलं. हे स्थान योगी, संत आणि ऋषी यांचं निवासस्थान होतं. आजही अनेक योगीपुरुष आणि ऋषी देवदर्शनादरम्यान मंदिर परिसरात निवासाला असतात.
या देवस्थानाबाबत आणखीही काही आख्यायिका सांगितल्या जातात. जीवदानी मातेच्या मंदिराचा पाया सतराव्या शतकात रचला गेल्याचे म्हटले जाते. मंदिरापर्यंत जाण्यासाठी भाविकांना १४०० पायऱ्या चढून जावे लागते. जीवदानी मातेचे मंदिर पूर्वी खूपच लहान होते. पायऱ्याही चढणीच्या होत्या. मात्र वेळेनुसार यात अनेक बदल करून भाविकांच्या सोयीनुसार त्यांची निर्मिती केली गेली आहे. १९४० ते १९५६ या काळात बारकीबाय नावाची भक्त रोज गडावर जाऊन नेमाने देवीची पूजा करीत असे, असं सांगितलं जातं. त्यानंतर १९५६ मध्ये देवीच्या भक्तांनी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली. सौम्य शीतल, प्रसन्न अशा या मूर्तीच्या डाव्या हाती कमलपुष्प आहे. तर उजव्या हाताने माता भाविकांना आशीर्वाद देत आहे. त्यापूर्वी देवीची लाकडी मूर्ती होती.
नवसाला पावणारी देवी म्हणूनही या मंदिराची ख्याती आहे. देशभरातील देवीभक्त या ठिकाणी दर्शनाकरीता येतात. आपल्या दु:खांचं निवारण व्हावं, आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून आईला साकडं घालतात. या मंदिरात दरदिवशी शेकडो भाविक येत असतात. मात्र नवरात्रीतील नऊ दिवस आणि अन्य उत्सवादरम्यान ही संख्या लाखोंच्या घरात असते. पवित्र मनाने मनोकामना करणाऱ्या भक्तांची प्रत्येक इच्छा आई पूर्ण करते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.