औरंगाबाद : राज्यात सत्तांतर होताच मराठा आरक्षण मागण्याची खाज सुटली का? असं वक्तव्य करणारे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर मराठा संघटनांकडून टीकास्त्र सोडण्यात येत आहे. सावंत यांनी माफी मागावी, अन्यथा त्यांची खाज उतरविल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे. तसंच मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटीलही आक्रमक झाले आहेत.

उस्मानाबाद येथील मेळाव्यात शिंदे गटाचे आमदार व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विरोधकांना मराठा आरक्षणाची खाज सुटली का? आता ओबीसीमधून आरक्षण मागत आहेत, नंतर एससीमधून मागतील असं सावंत म्हणाले. सावंत यांचे वक्तव्य बेताल असल्याचं मराठा संघटनांनी म्हटलं आहे.

‘मागील सरकारच्या काळात सावंत यांना मंत्री करण्यासाठी हेच मराठा कार्यकर्ते शिष्टमंडळ घेऊन भेटत होते. कोणत्या ताकदीच्या जोरावर सावंत यांनी एवढ्या खालच्या दर्जाचे वक्तव्य केलं आहे? सावंत यांच्या वक्तव्याची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घेऊन त्यांना समज द्यावी, अन्यथा याचे परिणाम गंभीर होतील.’, असा इशारा मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिला आहे. राज्यात ५० तरुणांनी बलिदान देऊन मराठा क्रांती मोर्चा उभा केला. सरकार कुणाचंही असलं तरी तरुणांची मागणी तीच असेल, असं पाटील म्हणाले.

अहमदनगर: २८ वर्षांची सत्ता खालसा, अगस्ती साखर कारखाना निवडणुकीत भाजपवासी पिचडांना हादरा

संभाजी ब्रिगेडनेही सावंत यांचा निषेध केला. ‘मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा, ही संभाजी ब्रिगेडची ३० वर्षांपासूनची मागणी आहे. कारण ती संविधानिक मागणी आहे. तानाजी सावंत यांच्यासारख्या सरंजामी आणि प्रस्थापित मराठ्यांमुळे गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळू शकलं नाही’, असे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी म्हटलं आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी सावंत यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

तानाजी सावंतांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा; वादग्रस्त वक्तव्यावर नाना पटोलेंचा संताप

न्यायालयात टिकणारे आरक्षण ओबीसीतून असेल तर मराठा तरुण ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मागणार आहेत. तानाजी सावंत यांच्या वागण्याने मराठा समाजाची बदनामी झाली आहे. सरकारमधील वरिष्ठांनी त्यांना समज द्यावी, अशी मागणी विनोद पाटील यांनी केली. तर तानाजी सावंत यांनी जाहीर माफी मागावी आणि मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. अन्यथा, मराठा क्रांती मोर्चा, संभाजी ब्रिगेड सावंत यांची खाज उतरवल्याशिवाय आणि धडा शिकविल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा डॉ. शिवानंद भानुसे यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here