ठाणे : शिवसेनेतील ऐतिहासिक फुटीनंतर होत असलेला यंदाच्या नवरात्रोत्सवाची ठाण्यात चांगलीच चर्चा रंगली आहे. कारण शहरात शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या टेंभी नाक्यावरील देवीच्या आगमनासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभे असलेल्या खासदार राजन विचारे या दोघांनीही हजेरी लावली. आनंद दिघे यांचे हे दोन्ही कट्टर शिष्य देवी आगमनाच्या निमित्ताने आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं.

ठाण्यातील टेंभीनाका येथे ४४ वर्षांपूर्वी आनंद दिघे यांनी नवरात्री उत्सव सुरू केला. दिघे यांच्या पश्चात राज्याचे एकनाथ शिंदे यांनी हाच वारसा पुढे सुरू ठेवला. आनंद दिघे यांचे शिष्य एकनाथ शिंदे आणि राजन विचारे हे नियमितपणे या देवीच्या आगमनाला उपस्थिती दर्शवत मोठ्या जल्लोषात देवीचे आगमन करत होते. मात्र यंदाच्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केलं आणि भाजपसोबत युती करत सत्ता स्थापन करून ते मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. त्यामुळे उद्धव ठाकरे समर्थकांकडून एकनाथ शिंदे यांना विरोध दर्शवत त्यांच्यावर सडकून टीका करण्यात आली. याचे पडसाद ठाण्यात मोठ्या प्रमाणात दिसून आले.

मोठी बातमी : जितेंद्र आव्हाड देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

टेंभी नाका येथील देवीच्या आगमनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः उपस्थित राहून देवीची पूजा केली आणि त्यांच्या उपस्थितीत देवीच्या आगमनाला सुरूवात झाली. तर या ठिकाणी ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजन विचारे, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे आणि अनेक शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी राजन विचारे आणि केदार दिघे यांनी देवीच्या रथाचा गाडा ओढला, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवीच्या आगमन मिरवणुकीदरम्यान सर्व समर्थकांची आणि नागरिकांची भेट घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here