काय आहे भुजबळांचे आक्षेपार्ह वक्तव्य ?
‘शाळांमध्ये फुले, आंबेडकर, शाहू, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे फोटो लावले पाहिजेत. कारण त्यांनी शिक्षणाचा अधिकार दिला. परंतु, सरस्वतीचा फोटो, शारदा मातेचा फोटो लावतात. जिला आम्ही कधी पाहिलं नाही. जिने आम्हाला काही शिकवलं नाही. असेलच शिकवलं तर फक्त तीन टक्के लोकांना शिकवलं आणि आम्हाला दूर ठेवलं तर त्यांची पूजा कशासाठी करायची?, असे वादग्रस्त वक्तव्य भुजबळ यांनी केले आहे.
महापुरुषांच्या फोटोंकडे पाहत भुजबळ म्हणाले, मला काही कळत नाही. अरे ज्यांनी तुम्हाला दिलं ते हे सगळे इथे आहेत. यांच्यामुळेच तुम्हाला शिक्षण मिळालं. अधिकार मिळाले आणि सगळं मिळेल. यांची पूजा करा हे तुमचे देव असले पाहिजेत. यांना देव समजून यांची पूजा झाली पाहिजे. यांच्या विचारांची पूजा झाली पाहिजे’, असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं होतं.
काल मुंबईमध्ये एका कार्यक्रमात छगन भुजबळ यांनी हे वक्तव्य केलं होतं. त्यामुळे राज्यात नवीन वादांग निर्माण झाला आहे. त्यामुळे आता भुजबळांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त लावण्यात आल्याचं चित्र आहे.
भुजबळांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद
आक्षेपार्ह वक्तव्यामुळे भुजबळांवर टीकेची झोड उठत आहे. ज्यांना लक्ष्मी दर्शनाच्या शिवाय काहीच दिसले नाही त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार अशी टीका भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकर यांनी केली आहे. हिंदू देवतांचे अपमान कदापी सहन करणार नाही, अशा प्रकारे वारंवार वक्तव्य करणे राष्ट्रवादी पक्षाचे धोरण आहे का असा सवाल पेशकार यांनी केला होता. तर या वादग्रस्त वक्तव्याचा भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी देखील समाचार घेतला.
हिंदू देवी देवतांची खिल्ली उडवणं हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे धोरण असून ते मुघलांचे वारसदार आहेत अशी घणाघाती टीका तुषार भोसले यांनी केली होती. त्यासोबतच राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया आणि टीका या वक्तव्याबद्दल समोर आल्या आहेत. भुजबळांच्या या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद म्हटल उमटले आहेत. भाजप उद्योग आघाडी आणि भाजप आध्यात्मिक आघाडीकडून याचा तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आलाय. वातवरण तापल्यामुळे खबरदारी म्हणून भुजबळ यांच्या भुजबळ फार्म या निवासस्थाना बाहेर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.