एक काळ असा होता की, इरफान पठाणची गणना भारताच्या सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये केली जात होती. सीम आणि स्विंगद्वारे धमाका केल्यानंतर त्याने आपल्या फलंदाजीच्या कौशल्याने तीन फॉरमॅटमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली होती. बडोद्याच्या या स्टारची मेहनत पाहून अनेकांना वाटले की, तो महान क्रिकेटपटू कपिल देव यांची जागा घेईल. पण दुर्दैवाने त्यांची कारकीर्द फार काळ टिकली नाही. काही लोक दुखापत हे देखील कारण सांगतात. मात्र, काही धोनीला दोष देतात.
अलीकडेच एका चाहत्याने ट्विट केले की, ‘जेव्हाही मी इरफान पठाणला या लोकांमध्ये पाहतो तेव्हा मी एमएस धोनी आणि त्याच्या व्यवस्थापनाला दोष देतो. इरफानने वयाच्या २९ व्या वर्षी व्हाईट बॉल फॉरमॅटमध्ये शेवटचा सामना खेळला होता, यावर माझा विश्वास बसत नाही. हे अजिबात योग्य नाही. कोणत्याही संघाला इरफान पठाणला सातव्या क्रमांकासाठी घ्यायला आवडेल, पण भारताने जड्डू, अगदी बिन्नीला देखील त्याच्यापेक्षा वरची संधी दिली.
हे ट्विट आगीसारखे पसरत होते. पठाणचे चाहते रिट्विट करत होते. कमेंट्सचा पूर आला होता. जेव्हा हे ट्विट जगभरात पाहिले गेले तेव्हा इरफान पठाणने रिट्विट करताना ‘मन की बात’ लिहिली. पठाणने लिहिले की, ‘यासाठी कोणाला दोष देऊ नका. तुमच्या प्रेमाबद्दल धन्यवाद.’ कोणतीही नकारात्मक टिप्पणी करण्याऐवजी इरफान पठाणची ही वृत्ती त्याच्या चाहत्यांना आवडल्याचे दिसत आहे.