Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Sep 28, 2022, 9:39 AM
Parbhani News : जिल्हा नियोजन समितीवर महाविकास आघाडी सरकारमधील पालकमंत्र्यांनी सदस्य म्हणून घेतलेल्या दोन आमदार आणि नऊ पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या शिंदे सरकारने धक्का देत रद्द केल्या आहेत.

हायलाइट्स:
- शिंदे सरकारचा दोन आमदारांसह नऊ पदाधिकाऱ्यांना धक्का.
- महाविकास आघाडी सरकारमधील नियुक्त्या रद्द.
- महाविकास आघाडीला मोठा दणका मानला जात आहे.
जिल्ह्यातील विविध विकास कामांना जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजुरी देण्यात येते. राज्यामध्ये ज्या पक्षाचे सरकार असते त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना नामनिर्देशीत व विशेष निमंत्रित म्हणून सदस्य केले जाते. त्यानुसार परभणीचे तत्कालीन पालकमंत्री नवाब मलिक यांनी नियोजन समितीवर नामनिर्देशीतमध्ये आमदार बाबाजानी दुर्राणी आणि आमदार डॉ. राहुल पाटील तर विशेष निमंत्रितांमध्ये माजी आमदार विजय भांबळे, प्रा. किरण सोनटक्के, रितेश काळे, संतोष सावंत, धोंडिराम चव्हाण, नदीम अहेमद खलील अ. इनामदार, डॉ. विवेक नावंदर, माणिक पोंढे, धैर्यशील कापसे पाटील यांना सदस्य म्हणून घेतले होते.
मात्र, आता राज्यामध्ये सत्तांतर झाले असून महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. त्यामुळे शिंदे सरकारने या सर्वांच्याच नियुक्त्या रद्द केल्या आहेत. यामध्ये दोन आमदारांचा आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याने हा महाविकास आघाडीला मोठा दणका मानला जात आहे. आता या रिक्त झालेल्या जागांवर भाजप आणि शिंदे गटातील कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.