कितीने वाढणार रेपो दर
ऑगस्ट महिन्यात किरकोळ महागाईचा दर ७ टक्के होता, जो रिझव्र्ह बँकेच्या सहा टक्क्यांच्या मर्यादेपेक्षा जास्त आहे. अशा परिस्थितीत आरबीआय पॉलिसी बैठकीत सलग चौथ्यांदा रेपो दर वाढवू शकते. आरबीआय रेपो दर सुमारे ०.५० टक्क्यांनी वाढवू शकते असा जेपी मॉर्गन ते मॉर्गन स्टॅनली यांना अंदाज वर्तवला आहे. मॉर्गन स्टॅन्लेने आपल्या अहवालात म्हटले की, यापूर्वी आम्ही अंदाज लावला होता की रेपो रेट ३५ बेस पॉईंटने वाढू शकतो. पण महागाई वाढल्यानंतर आणि जगभरातील मध्यवर्ती बँकांच्या वृत्तीनंतर रेपो दरात ०.५० टक्क्यांनी वाढ होऊ शकते असा आमचा अंदाज आहे.
ग्राहकांवर काय होईल परिणाम?
रिझर्व्ह बँकेच्या व्याजदर वाढीने बँकांच्या व्याजदरात भरमसाठ वाढ होईल. मध्यवर्ती बँकेच्या या निर्णयानंतर बँकाही कर्जावरील व्याजदर वाढवतील. अशा परिस्थितीत ज्या ग्राहकांनी आधीच बँकेकडून कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतले आहे, त्यांना आता अधिक EMI भरावा लागेल. तर कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना कर्ज घेणे महाग होईल. रेपो दर वाढल्यावर गृहकर्जापासून वाहन, शैक्षणिक आणि व्यावसायिक, अशी सर्वप्रकारची कर्ज महाग होतील.
एफडी गुंतवणूकदारांना फायदा
मुदत ठेवीतून बचत करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे बचत आणि एफडी असलेल्या अशा ग्राहकांना फायदा होणार आहे. धोरणात्मक व्याजदरात वाढ झाल्यामुळे बँका एफडीवरील व्याजदर वाढवते किंवा किमान कमी करण्याचा निर्णय घेणार नाहीत.
तीनदा रेपो दरात वाढ
चालू वर्षात म्हणजे २०२२ मध्ये आरबीआयने रेपो रेट एकूण १.४० टक्क्यांनी वाढवला आहे. मे महिन्यात प्रथमच आरबीआयने ४० बेस पॉइंट्स, दुसऱ्यांदा जूनमध्ये ०.५० बेस पॉईंट्सने आणि नंतर ऑगस्टमध्ये पुन्हा ०.५० टक्क्यांनी आपल्या व्याजदरांमध्ये वाढ केली. अलीकडे, अमेरिकेची फेड रिझर्व्ह आणि बँक ऑफ इंग्लंडने देखील व्याजदरात वाढ केली आहेत. यामुळे आता रिझर्व्ह बँकेवरही दबाव वाढला आहे. मात्र, व्याजदर वाढवण्याची प्रक्रियाही येथेच थांबण्याची शक्यता असून आगामी काळात वस्तूंच्या किमती कमी झाल्याने महागाई नियंत्रणात येण्याची शक्यता आहे.