टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा उद्योग क्षेत्रातील एक अशी व्यक्ती आहेत, ज्यांचे शब्द लोक खूप लक्षपूर्वक ऐकतात आणि त्यांचा गांभीर्याने विचार करतात. त्यांचे शब्द खूप फायदेशीर आहेत आणि व्यक्तीला नेहमी चांगले काम करण्यास प्रवृत्त करतात. आता पुन्हा एकदा टाटांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये टाटा समूहाच्या मानद अध्यक्षांनी सांगितले की कोणत्या कामामुळे त्यांना सर्वात जास्त आनंद मिळतो. RPG एंटरप्रायझेसचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. टाटा यांनी या व्हिडिओमध्ये जे म्हटले त्याने लाखो यूजर्सची मने जिंकली आहेत. यामुळेच या व्हिडिओला भरघोस प्रतिसाद मिळत असून लोक मोठ्या प्रमाणात शेअर करत टाटांचे कौतुक करत आहेत.
लोकांना जे अशक्य वाटतं…
रतन टाटा यांनी या व्हिडिओमध्ये मोठी गोष्ट सांगितली आहे. “सामान्य माणसाला जे काम करणे अशक्य वाटते ते काम करण्यात मला आनंद मिळतो,” असे ते म्हणाले. सोशल मीडिया यूजर्स टाटांच्या या गोष्टींचे फॅन झाले आहेत. टाटांकडे उद्योगपती तसंच लोकांसाठी प्रेरणास्थान म्हणूनही पाहिलं जातं. हर्ष गोएंका यांनी ट्विट केलेल्या टाटांच्या या व्हिडिओमध्ये त्यांचे शब्द लोकांसाठी प्रेरणादायी बनले आहेत.
त्यांच्या विचारसरणीची अनेक उदाहरणे
अशी अनेक उदाहरणे आहेत जेव्हा त्यांनी आपला मुद्दा सिद्ध केला आहे. टाटा इंडिका आणि फोर्डचे प्रकरण असो किंवा टाटा नॅनो बनवणे असो, देशवासीयांना केवळ एक लाख रुपयांत त्यांच्या गाडीतून प्रवास करण्याचा अनुभव करून देणे, रतन टाटा यांनी अशी अनेक कामे केली आहेत. जे याच विचारसरणीशी निगडीत आहेत.
टाटा समूहाचा इतिहास
रतन टाटा यांच्या नेतृत्वाखालील टाटा समूहाबद्दल बोलायचे झाले तर स्वातंत्र्यापूर्वी सुरू झालेल्या कंपन्यांमध्ये टाटा समूहाचे नाव अग्रस्थानी येते. देशाला मीठापासून आलिशान गाड्या बनवणाऱ्या या समूहाचा व्यवसाय १८६८ मध्ये सुरू झाला. आज आयटी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी TCS, मेटल क्षेत्रातील टाटा स्टील, ऑटो क्षेत्रातील टाटा मोटर्ससह इंडियन हॉटेल कंपनी या समूहाचा भाग आहेत.