शारदीय नवरात्र उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी श्री सिध्दिदानी मातेच्या रूपात दर्शन

श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात सध्या नवरात्र उत्सव साजरे होत आहे आणि या नवरात्र उत्सवात श्री आई अंबाबाई नऊ दिवस वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्या भक्तांना दर्शनासाठी येत असते दरम्यान आज नवरात्र उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आई अंबाबाई ही श्री सिध्दिदानीच्या रुपात भक्तांच्या भेटीला आली आहे.
श्री दुर्गादेवीच्या नऊ अवतारांपैकी (नवदुर्गा) नववा अवतार म्हणजे सिध्दिदात्री. देव, दानव, मानव आदिंना सिध्दी प्रदान करणारी देवी म्हणजे सिध्दिदात्री. सिध्दी म्हणजे असामान्य क्षमता. मार्कण्डेय पुराणानुसार अणिमा, महिमा, गरिमा, लधिमा, प्राप्ति, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्त्व ह्या आठ सिध्दी आहेत. ब्रह्मवैवर्तपुराणानुसार ह्या आठ धरुन एकूण अठरा सिध्दी आहेत. अष्टसिध्दींचे संक्षिप्त वर्णन याप्रमाणे –
अणिमा – देहाला सूक्ष्म करण्याची शक्ती महिमा देहाला असीमित विशाल करण्याची शक्ती
गरिमा- देहाचा भार असीमित वाढवण्याची शक्ती
लघिमा- प्राप्ति देहाला अतिशय हलके करण्याची शक्ती अदृश्य होऊन कोणत्याही ठिकाणी जाण्याची शक्ती
प्राकाम्य -दुसऱ्याच्या मनातील भाव सहजपणे ओळखण्याची शक्ती
ईशित्व – स्वतः ईश्वरस्वरुप होण्याची शक्ती
वशित्व- कोणत्याही व्यक्तीला आपला दास करण्याची शक्ती.सिध्दिदात्रीच्या कृपाप्रसादानंतर भक्ताची कोणतीही लौकिक आणि पारलौकिक कामना शेष (बाकी) रहात नाही.
देवी पुराणानुसार भगवान शंकरांनी सिध्दिदात्रीच्या कृपेनेच सिध्दी प्राप्त केल्या, तसेच तिच्या अनुकंपेने त्यांचे अर्धे शरीर देवीचे झाले. त्यामुळे भगवान शंकर अर्धनारीश्वर ह्या नावाने प्रसिद्ध झाले.
श्री सिध्दिदात्री कमलासनावर विराजमान आहे. ती चतुर्भुज असून, तिने शंख, चक्र, गदा व कमळ धारण केलेले आहे.
दिवस दुसरा : शारदीय नवरात्र उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी श्री अंबाबाईचे दुर्गा मातेच्या रूपात दर्शन

कोल्हापूर
श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात सध्या नवरात्र उत्सव साजरा होत आहे आणि या नवरात्र उत्सवात श्री आई अंबाबाई नऊ दिवस वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्या भक्तांना दर्शनासाठी येत असते. दरम्यान आज नवरात्र उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आई अंबाबाई ही दुर्गामातेच्या रुपात भक्तांच्या भेटीला आली आहे.
शारदीय नवरात्र महोत्सवाच्या आजच्या द्वितीया तिथीला करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई अष्टभुजा सिंह वाहिनी दुर्गेच्या रूपात सजली आहे. दुर्गा म्हणजे दुर्गम असुराला मारणारे जगदंबेचे स्वरूप महात्म्याच्या अकराव्या अध्यायात देवीने स्वतःच्या भविष्यात्मक अवतारांचा उल्लेख केला आहे. त्या वेळेला पुढे दुर्गमसुराला मारल्यानंतर माझे नाव दुर्गा म्हणून प्रसिद्ध होईल असे वचन देवीने स्वतः दिलेले आहे. या स्वरूपात भगवती अष्टभुजा धारण करून सिंहावरती विराजमान आहे. हातामध्ये शंख चक्र खड्ग धनुष्यबाण वरद कमळ त्रिशुळ तलवार आदी आयुधं धारण करीत असते. दुर्गा या नावाने आदिशक्तीच्या दुस्तर म्हणजे अवघड गोष्टींना सुद्धा सोपं करणारी या रूपाचा बोध होतो. आजच्या द्वितीया तिथीला जगदंबेचे हे देवी कवचात वर्णन केलेल्या नवदुर्गांनी युक्त अष्टभुजा स्वरूप साकारले आहे. अनिलराव कुलकर्णी, आशुतोष कुलकर्णी, श्रीनिवास जोशी आणि गजानन मुनीश्वर यांनी ही पूजा बांधली आहे.
दिवस पहिला : श्री. अंबाबाईला सिंहासनाधीश्वरी या रूपात साकारण्यात आले.

आजपासून श्री अंबाबाई मंदिरामध्ये नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे आणि या नऊ दिवसाच्या नवरात्री उत्सवात श्री अंबाबाईला विविध रूपामध्ये दाखवण्यात येत असते. यापैकी आज पहिल्या दिवशी म्हणजेच अश्विन शुद्ध प्रतिपदेला श्री अंबाबाई मंदिरामध्ये घटस्थापना करण्यात आली. तसंच श्री अंबाबाईला सिंहासनाधीश्वरी या रूपात साकारण्यात आले आहे.
आज अश्विन शुद्ध प्रतिपदा प्रतिपदेच्या दिवशी नवरात्र अनुष्ठान प्रारंभ होतो. नवरात्र म्हणजे फक्त देवीचा आनंद उत्सव नसतो तर स्वतःच्या आत्मिक शक्तीला जागे करण्याचे एक महत्त्वाचे पर्व. हे अनुष्ठान आहे. अनुष्ठानाची पहिली पात्रता म्हणजे स्थिरता. ही स्थिरता येण्यासाठी आसनस्थ असणं गरजेचं असतं आणि इथं अनुष्ठानं तर श्रीमद सिंहासनेश्वरीचे आहे. भगवतीच्या अनेक नावांपैकी एक हे ललिता सहस्त्रनामातील देवीचे नाव.
साधारणपणे माणसाच्या विभूतीच्या नावाआधी श्री हे उपपद लागतं. परंतु देवीच्या सिंहासनाच्या नावाआधी श्री उपाधी लावली जाते. याचं कारण ती ज्या आसनावर विराजमान आहे ते आसनच मुळात सृष्टीच्या उत्पत्ती स्थिती लयाचे कर्ते असणाऱ्या त्रिदेवांच्या आधाराने तयार झाले आहे. त्यामुळे जगदाद्य शक्ती अशी करवीर निवासिनी या आजच्या पूजेमध्ये सिंहासनावर विराजमान होऊन भक्तांना दर्शन देत आहे अशा स्वरूपाची आजची पूजा सिंहासनाधीश्वरी या रूपात साकारली आहे. अशी ही आजची पूजा अनिलराव कुलकर्णी, आशुतोष कुलकर्णी श्रीनिवास जोशी व गजानन मुनीश्वर यांनी साकारली आहे.
मंदिराच्या मांडणीवरून ते चालुक्यांच्या काळात इ.स. ६०० ते ७०० मध्ये बांधले असण्याची शक्यता आहे. मंदिराचे पहिले बांधकाम राष्ट्रकूट किंवा त्या आधीच्या शिलाहार राजांनी सुमारे आठव्या शतकात केले असावे. पुराणे, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्रे आणि सापडलेली अनेक कागदपत्रे यांवरून अंबाबाई मंदिराचे पुरातनत्व सिद्ध होते आणि कोल्हापूरची अंबाबाई खर्या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरते.
कधी काळी मोगलांनी या देवळाचा विध्वंस केला तेव्हा देवीची मूर्ती पुजार्याने अनेक वर्षे लपवून ठेवली होती, असे म्हणतात. पुढे संभाजी महाराज यांच्या कारकीर्दीत मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आले. मंदिराचे उत्तम कोरीव काम असलेल्या भिंती आणि राज्यात कुठेही नसेल अश्या प्रकारचे मंदिराचे शिखर असून या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिर तीन विभागात विभागले आहे, मात्र बांधणी अशा प्रकारे आहे की मंदिर पाहताच सर्व एकच मंदिर आहे असे वाटते तसेच हे मंदिर दुमजली असून अंबाबाई मंदिराच्या अंतर्गत रचनेत दोन मजले करण्यात आले आहेत. खाली गाभाऱ्यात करवीर निवासिनी अंबाबाईची मूर्ती असून तिच्या डोक्यावरच म्हणजेच वरच्या मजल्यावर मातृलिंग मंदिर आहे. खाली कासव चौक आणि गर्भगृहात अंबाबाईची मूर्ती आहे. त्याच पद्धतीने वरच्या मजल्यावर नंदी आणि गर्भगृहात मातृलिंग आणि चौथऱ्यावर गणेशाची मूर्ती असून याच मंदिरावर मुख्य शिखर आहे. या मंदिरात जाण्यासाठी चिंचोळ्या गुप्त पायऱ्या आहेत. पण वर्षातील केवळ मोजक्या दिवशी हे मंदिर दर्शनासाठी उघडले जाते अश्याप्रकारचे देशातील हे एकमेव मंदिर आहे.
मंदिरात सध्या नवरात्रोत्सवाची लगबग सुरू आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसात करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात रोज देवीला वेगवेगळे रूप देण्यात येत असतात. दरवर्षी अश्विन शुद्ध प्रतिपदा अर्थातच घटस्थापनेला सकाळी साडे आठ वाजता अंबाबाईची महापूजा पार पडते. त्यानंतर अंबाबाईच्या समोरच गाभाऱ्यात श्रीपूजक, इतर महत्वाच्या व्यक्ती आणि देवस्थान पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घटस्थापना केली जाते. घटस्थापनेला अंबाबाईची उत्सवमूर्ती सनई ताशांच्या गजरात घटाच्या शेजारी विराजमान होते आणि ज्या उत्सवाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात त्या नवरात्रोत्सवाला सुरुवात होते.घटस्थापनेनंतर करवीर निवासिनी अंबाबाईची दररोज विविध रुपात अलंकारिक पूजा बांधण्यात येते.सोबतच रात्रीचा पालखी सोहळा ही येथील पाहण्यासारखा असतो.