अमरावती : अचलपूर मतदारसंघाचे एकनाथ शिंदे समर्थक आमदार बच्चू कडू यांनी कार्यकर्त्याला कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मात्र बच्चू कडू यांनी हा आरोप फेटाळला आहे. कथित मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त करत बच्चू कडू यांनी सदर कार्यकर्त्याला थेट अमरावतीत आणले आणि खरी परिस्थिती माध्यमांसमोर सांगण्याची विनंती केली.
‘मला बदनाम करण्याचा प्रयत्न’
कार्यकर्त्याला मारहाण केल्याची बातमी पसरल्यानंतर बच्चू कडू यांच्यावर चहुबाजूने टीका सुरू झाली. यानंतर स्पष्टीकरण देताना कडू म्हणाले की, ‘मी मारहाण केलेली नाही. एका विषयासंदर्भात बोलताना मी कार्यकर्त्याला हात झटकून फक्त थांब इतकंच म्हणालो. कार्यकर्त्यासोबत आमचं कौटुंबिक नातं असतं. मात्र अशा बातम्या पसरल्याने वेगळं वातावरण तयार होतं,’ अशी सारवासारव बच्चू कडू यांनी केलं आहे.